Navi Mumbai News: अध्यात्माच्या आधारे प्राचीन ऋषी-मुनींनी भारतीय संस्कृतीची केलेली रचना जतन करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे.
अध्यात्मच जीवनानंद देते आणि हा आनंद आम्हाला श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवातून मिळाला, अशी भावना पुणे येथील ‘नवचैतन्य हास्य योग क्लब’च्या महिलांनी व्यक्त केली.
घर आणि कुटुंबातील जबाबदाऱ्यांपर्यंत सीमित असणाऱ्या बहुतांश महिलांना अध्यात्माच्या मार्गाने जीवनानंद मिळतो. वेदांमध्ये संस्कृतीचे सार सामावले असून त्यावर आधारित समाजरचना तयार झाल्यास सर्वांना जीवनानंद मिळेल.
हा आनंद श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याने आमच्या जीवनात आणला. याबद्दल आम्ही ‘सकाळ’चे मनस्वी आभारी आहोत, अशी भावना या महिलांनी व्यक्त केली. संकल्प ते सिद्धी सोहळ्यातून सकारात्मक ऊर्जा, मनशुद्धी, ध्यानधारणा म्हणजे काय? त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि समृद्ध संतपरंपरा याविषयी माहिती मिळाल्याचे या गुरुसेविकांनी सांगितले.
सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आवर्जून उपस्थित राहिला होता. काहींनी दिंडी उत्सव स्थळी आणली होती. अवघा परिसर हरिनामाच्या गजरात न्हाऊन गेला होता. दुपारनंतर डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती वीणा आणि टाळ-मृदंगांच्या गजरात माऊलीच्या दिंडीचे आगमन झाले. मुख्य प्रवेशद्वारात बालवारकऱ्यांची अभंगवाणी आणि हरिपाठ रिंगण पाहण्याची संधी भाविकांना मिळाली. आळंदी येथून आलेल्या बालवारकऱ्यांनी हरिपाठ करत घातलेल्या रिंगण सोहळ्याने गुरुसेवकांची मने जिंकली.
नाशिकमधील सापुतारा येथील भक्तगण आपल्या परिवारासह पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. जवळपास साठहून अधिक जण दोन वाहनांंतून आले होते. मुंबईत राहणाऱ्या मुलाकडून आम्हाला १८ पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी होणार असल्याचे समजले. त्यानंतर आम्ही रात्रीच नाशिकहून निघालो आणि नवी मुंबई गाठली. सकाळी लवकर पोहोचल्यामुळे पादुकांचे दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.