नवी मुंबई : नवी मुंबईत उद्यापासून (ता. २६) दोन दिवस पादुका सोहळा रंगणार असून भक्तिरसात न्हाऊन निघण्यासाठी आतुर झालेल्या लाखो भाविकांची पावले राज्यभरातून वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरकडे वळू लागली आहेत.
‘श्रीगुरू पादुका उत्सवा’च्या निमित्ताने संत-महात्म्यांच्या सहवासात दंग होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून गुरुसेवक येत असून त्यांच्या स्वागतासाठी भव्यदिव्य मंडप उभारण्यात आला आहे.
मंडपात श्रीगुरू पादुका मंदिर साकारण्यात आले असून संतांच्या परंपरेचा जागर करणाऱ्या कलाकृती आणि स्थापत्यकलेचे अप्रतिम नमुनेही उभारण्यात आले आहेत. २६ आणि २७ मार्च रोजी होणाऱ्या पादुका दर्शन सोहळ्यासाठी अवघी वाशीनगरी सज्ज झाली आहे.
अध्यात्माच्या क्षेत्रातील ज्यांच्याकडे आपण श्रद्धेने जातो अशा महाराष्ट्रातील १८ श्रीगुरूंच्या पादुकांच्या चरणी लीन होण्याची संधी ‘संकल्प ते सिद्धी’ सोहळ्यानिमित्त उपलब्ध झाली आहे. एकाच छताखाली साधकांना आपल्या गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची अपूर्व संधी मिळणार आहे.
पादुका ठेवण्यासाठी मूळ स्वरूपानुसार तटी, भक्तिगीतांचा सूरमयी सोहळा आणि अग्निहोत्र यांची व्यवस्था पूर्ण झाली आहे. श्रीगुरू पादुका सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दोन दिवस महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ‘सकाळ माध्यम समूहा’ने आनंदी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी ‘संकल्प ते सिद्धी सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून २६ आणि २७ मार्चला ‘श्रीगुरू पादुका उत्सव’ होत आहे.
महाराष्ट्र साधू-संतांची भूमी आहे. आपल्या दिव्य ज्ञानाने त्यांनी गुरुसेवकांचे जीवन प्रकाशमान केले आहे. साधू-संतांची शिकवण आणि आशीर्वाद मिळवण्याची अनुभूती गुरुसेवकांना पादुका सोहळ्याच्या माध्यमातून मिळणार आहे.
राज्यातील १८ श्रीगुरूंच्या पादुका नवी मुंबईत दाखल झाल्या आहेत. राज्यातील पारंपरिक स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असणाऱ्या ऐतिहासिक मंदिरांच्या कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. श्रीगुरूंच्या पादुका ठेवण्यासाठी त्यांच्या मूळ स्वरूपानुसार तटी उभारण्यात आल्या आहेत. तेथेच पादुकांचे दर्शन करता येणार आहे.
भव्यदिव्य ‘श्रीगुरू पादुका सोहळ्या’साठी महाराष्ट्रातील १८ संत-महात्म्यांच्या पादुका आणण्यात आल्या असून त्यांचे आगमन आज नवी मुंबईत झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज आणि संत निळोबाराय महाराज यांच्या पादुकांचे टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
राज्यातील संतांच्या पादुका प्रस्थान करण्यापूर्वी मंदिरात आरती घेण्यात आली. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात या संतांच्या पादुकांना वारकऱ्यांनी निरोप दिला. सकाळी नवी मुंबईच्या दिशेने निघालेल्या सेवकांनी पुण्यात दुपारी पादुकांना नैवेद्य दाखवला.
सायंकाळी ‘सकाळ’च्या सीबीडी-बेलापूर येथील कार्यालयात या पादुकांचे आगमन झाले. सायंकाळी हरिपाठ आणि संतांची आरती आणि शेजआरती करण्यात आली. त्यात ज्ञानेश वारकरी गुरुकुल संस्थेच्या ४० वारकरी विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.
श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या आशीर्वादाने पादुका दर्शन सोहळा होत आहे. सोहळ्यात आध्यात्मिक गुरू श्री एम यांची विशेष उपस्थिती असणार आहे. डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाच हजार भाविक एकाच वेळी अग्निहोत्र करणार आहेत.
ओंकार जप आणि धुनी प्रज्वलन होणार आहे. त्यासाठी श्रीगुरू पादुका मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन आणि सत्संग व आर्थिक सुबत्तेसाठी कृतिशील प्रशिक्षण मिळणार असून आनंदी जीवनशैलीकडे व भौतिक विकासाकडे वाटचाल करण्यास मदत होणार आहे.
श्रीगुरू पादुका मंदिराच्या प्रवेशद्वारावर संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांची भव्य शिल्पे साकारण्यात आली असून ती अत्यंत आकर्षक आहेत. भाविकांच्या स्वागतासाठी दोन महाकाय गजराजांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारावर मनमोहक फुलांची आरास भाविकांचे मन प्रसन्न करणार आहे.
भक्तिगीतांच्या सुरावटीतून अध्यात्माकडे घेऊन जाणारा सूरमयी सोहळा मुख्य आकर्षण ठरणार आहे. प्रसिद्ध गायक हरिहरन यांचा भक्तिगीतांचा संगीत सोहळा मंगळवारी (ता. २६) आणि गायक-संगीतकार शंकर महादेवन यांचा बुधवारी (ता. २७) रंगणार आहे.
अध्यात्माशी जोडणाऱ्या भक्तिरसामध्ये भाविकांना न्हाऊन निघण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी श्रीगुरू पादुका मंदिराच्या शेजारील खुल्या मैदानात भव्यदिव्य मंच उभारण्यात आला आहे. या मंचावरूनच सूरमयी भक्तिरस वाहणार आहे.
नागरिकांना पादुका दर्शन सोहळ्यासाठी विनामूल्य प्रवेश असेल; मात्र त्यासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. अधिक माहितीसाठी ८८८८८३९०८२ या दूरभाष क्रमांकावर संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.