पालघरमध्ये धडकणार आदिवासी वादळ

पालघर ः आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनासाठी करण्यात आलेली तयारी.
पालघर ः आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनासाठी करण्यात आलेली तयारी.
Updated on

विरार ः निसर्गपूजक असलेल्या आदिवासी समाजाची परंपरा, भाषा, कला-संस्कृती या संवर्धनासाठी, समाजाचे अस्तित्व, न्याय्य हक्कांसाठी जनजागृती करून मानवमुक्ती व प्रकृती या दोन मुद्द्यांवर समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेतर्फे सोमवारपासून (ता.१३) ते बुधवारपर्यंत (ता.१५)  पालघर येथे २७ वे ‘आदिवासी एकता संस्कृतिक महासंमेलन’ होणार आहे. यात देशातील विविध भागांतून एक लाखांहून अधिक आदिवासी सहभागी होण्याची शक्‍यता संस्थेने वर्तवली आहे. 

आदिवासी हे खरे मूळ निवासी असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले असताना देशातील आदिवासींच्या अस्तित्वावर हल्ले होत आहेत. आदिवासींचे जल, जंगल व जमीन यावरील अधिकार नाकारले जात असून पाचव्या व सहाव्या अनुसूचीअंतर्गत; तसेच पेसा कायद्याने दिलेल्या ग्रामसभेचे अधिकार अशा संविधानात्मक तरतुदींचे उल्लंघन होत आहे, असा आदिवासींचा आरोप आहे.

पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असला, तरी विकासाच्या नावाखाली डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, वाढवण बंदर, सागरी महामार्ग आदी प्रकल्पांच्या माध्यमातून आदिवासींना हद्दपार केले जात आहे, अशी आदिवासींची तक्रार आहे. तसेच संपूर्ण देशात विकासाच्या नावाने राबवल्या जाणाऱ्या विनाशनीतीच्या विरोधात आदिवासी एकता परिषदेतर्फे संघर्ष करण्यात येत असून या महासंमेलनाच्या निमित्ताने यावर चर्चा होणार आहे. 

महासंमेलनात आदिवासी जीवनशैली, पारंपरिक अवजारे, खाद्यपदार्थ व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. ‘आदिवासीत्व’ हा केंद्रबिंदू ठेवून संमेलन होणार आहे. या संमेलनानिमित्त मंगळवारी (ता.१४) पालघर येथे सांस्कृतिक फेरी काढण्यात येणार आहे. यामध्ये तारपा, ढोलनाच; तसेच देशभरातील आदिवासी जनसमूहाची कला व संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे, अशी माहिती काळुराम धोदडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

विविध विषयांवर चर्चा 
महाराष्ट्रात होणारे हे सातवे महासंमेलन असून या संमेलनात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, सेलवास- दादरानगरहवेलीसह देशातील प्रतिनिधी आणि आदिवासी महासंमेलनात सहभागी होण्याची शक्‍यता आहे. या तीनदिवसीय संमेलनात आदिवासी संस्कृती व इतर संघटित धर्माचा प्रभाव, आदिवासी महिलांचे प्रश्‍न-उपाय, आदिवासी स्वावलंबन, अर्थव्यवस्था व प्रकृती संतुलन, तथाकथित मुख्य धारेची विकास दृष्टी व पर्याय, आदिवासी स्वशासन, संविधानिक अधिकार व मानव अधिकार, आदिवासी एकता परिषदेचे घोषणापत्र व शोषणमुक्ती आंदोलन, आदिवासी शिक्षण व आरोग्य; तसेच पर्यावरण संकट, आदिवासी जीवनशैलीतील समाधान आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.