मोखाडा. ता. - पालघर लोकसभेतुन महायुती चे डाॅ हेमंत सवरा हे प्रचंड मताधिक्याने निवडुन आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजप मध्ये सर्वच ठिकाणी हर्षोऊल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, मोखाडा तालुक्यात भाजप- शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दुरावा वाढला आहे. खोडाळा जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी, भाजप ऊमेदवाराऐवजी प्रतिस्पर्धी ऊबाठाच्या ऊमेदवाराला मदत करून, दगाबाजी केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीत या दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
पालघर लोकसभेच्या निवडणुकीत महायुती कडून भाजप चे डाॅ. हेमंत सवरा हे 1 लाख 83 हजार 306 एव्हढ्या प्रचंड मताधिक्याने निवडुन आले आहेत. सवरांना 6 लाख 1 हजार 244 मते मिळाली आहेत. तर दुसर्या क्रमांकावर शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऊमेदवार भारती कामडींना 4 लाख 17 हजार 938 मते मिळाली आहे. भाजप ने पालघर लोकसभेची जागा पुन्हा आपल्याकडे खेचून आणली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल ऊधळुन दिवाळी साजरी केली आहे. या विजयी आनंदात महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
मात्र, मोखाडा तालुक्यात भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये कमी मताधिक्याच्या वादाने दुरावा निर्माण झाला आहे. तालुक्यातील खोडाळा जिल्हा परिषद गटात भाजपचे वर्चस्व असताना, येथून डाॅ. हेमंत सवरांना अपेक्षित मताधिक्य मिळालेले नाही. त्यातच ज्या भागात शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आहेत, तेथे ऊबाठा च्या ऊमेदवार भारती कामडी यांच्यापेक्षा अगदी मोजकेच मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी ऊबाठा च्या ऊमेदवाराला मदत केल्याचा थेट आरोप भाजप पदाधिकार्यांनी केला आहे.
खोडाळा जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना सर्व बाबींची पूर्तता आणि रसद पुरवूनही त्यांनी दगाबाजी केल्याचा आरोप भाजप पदाधिकार्यांनी केला आहे. या जिल्हा परिषद गटात खोडाळा आणि सायदे हे दोन पंचायत समिती गण आहेत. खोडाळा जिल्हा परिषद गटात डाॅ. हेमंत सवरांना 6 हजार 644 तर भारती कामडींना 4 हजार 769 मते मिळाली आहेत. यामध्ये सायदे गणात सवरांना 3 हजार 304 तर कामडींना 2 हजार 343 तसेच खोडाळा गणात डाॅ. हेमंत सवरांना 3 हजार 340 आणि कामडींना 2 हजार 426 मते मिळाली आहेत. खोडाळा जिल्हा परिषद गटात डाॅ. हेमंत सवरांना केवळ 1 हजार 875 मतांची आघाडी मिळाली आहे.
या गटात ऊबाठाचे कुठलेही मोठे पदाधिकारी अथवा लोकप्रतिनिधी नाहीत. तरीही कामडींना एव्हढे मतदान कसे झाले? असा सवाल भाजप पदाधिकार्यांनी ऊपस्थित केला आहे. तर जेथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आहेत तेथे आम्ही सर्व कारभार त्यांच्या हाती सोपवला होता. मात्र, त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून, ऊबाठा च्या ऊमेदवाराला मदत केल्याचे, मतदानाच्या आकडेवारी वरून समोर आले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी आमच्याशी दगाबाजी केल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचे कुठलेही काम आमचा कार्यकर्ता करणार नाही आणि त्यांना त्यांची खरी जागा दाखवून देणार असल्याचे जिल्हा परिषद गट प्रमुख मिलिंद झोले आणि खोडाळा पंचायत समिती गण प्रमुख नामदेव पाटील यांनी सकाळला सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.