Yogi Adityanath : नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज

‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत ‘हिंदवी स्वराज्या`ची स्थापना नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्याला देशात पुन्हा करायची आहे.
yogi adityanath with dr hemant savara
yogi adityanath with dr hemant savarasakal
Updated on

विरार - ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत ‘हिंदवी स्वराज्या`ची स्थापना नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्याला देशात पुन्हा करायची आहे. आणि ही स्वराज्य स्थापना करण्यापासून आपल्याला कोणाचाही बाप रोखू शकत नाही. मागच्या वेळी मी पालघरमध्ये आलो होतो तेव्हा सायंकाळची वेळ होती; तेव्हा आपण काँग्रेसचा सूर्यास्त केला होता.

आज मला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे दुपारच्या वेळात पालघरमध्ये घेऊन आले आहेत. हे ‘हिंदवी स्वराज्या`साठीचे सुचिन्ह आहे,` अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांनी आपल्या हिंदुत्ववादी विचारांतून ‘नवीन भारता`करता ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज व्यक्त केली.

पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचे आयोजन शनिवार, 18 मे रोजी नालासोपारा पश्चिम-श्रीप्रस्था रोड येथील स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावर करण्यात आले होते. या सभेतून योगी यांनी इंडिया गठबंधनसह पाकिस्ताचा समाचार घेतला.

100 वर्षे गेली तरी राममंदिर निर्माण होणार नाही, अशी खिल्ली त्या वेळी इंडिया गठबंधनमधील नेते उडवत होते. पण आम्ही ते काम करून दाखवले. अयोध्येत राममंदिर बांधून दाखवले, याचा अभिमान योगी आदित्यनाथ यांनी या वेळी व्यक्त केला. पण आता यांच्या तोंडून दोन वाईट गोष्टी बाहेर पडत आहेत. इंडिया गठबंधनचे सरकार आले; तर राममंदिराचे काय करायचे हे आम्ही बघू, अशी धमकी हे दाखवत आहेत.

पण रामलल्ला त्यांना दिल्लीपर्यंत पोहोचण्याच्या लायक ठेवणारच नाहीत, असा विश्वास योगी यांनी व्यक्त केला. दुसरी गोष्ट म्हणजे; हिंदूंच्या बाजूने रामंदिर निर्माणाबाबत कोर्टाचा निर्णय आला तर देशभरात दंगली होतील, रक्ताचे पाट वाहतील, अशी भीती हे घालत होते. अखेर कोर्टाचा निर्णय आला.

राममंदिराचा शिलान्यास झाला; किंबहुना राममंदिर बांधून तयारही झाले. पण कुठे ठिणगीही पडली नाही. दंगल तर लांबच राहिली. उत्तर प्रदेशात मागील सात वर्षांत एकदाही दंगल झालेली नाही, अशी माहिती योगी यांनी या वेळी दिली.

चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. संपूर्ण देशात मोदीमय वातावरण आहे. त्यानंतरही इंडिया आघाडीवाले विचारत आहेत, चार सौ पार कसे जाणार? पण ज्यांनी रामाला आणले आहे, तेच मोदींना आणणार आहेत. त्यामुळे या वेळी चारशे पार आपल्याला जायचं आहे. मोदींनी सर्वांना सन्मान मिळवून दिला आहे. विकास दिला आहे. त्यामुळे देशावर रामभक्त सत्ता स्थापित करणार; की रामद्रोही हे तुम्हाला ठरवायचे आहे.

भारताला आत्मनिर्भर व आत्मविकसित करण्याची ताकद केवळ मोदींत आहे. काँग्रेस व त्यांच्या इंडिया गठबंधनचे विसर्जन करण्याची हीच वेळ आहे, असे योगी म्हणाले. इंडिया गठबंधनमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी फार पूर्वीच औरंगजेबाचा खात्मा केलेला आहे.

आता महाराष्ट्रात औरंजेब आणि त्याच्या पिलावळीला येऊ द्यायचे नाही, असे आवाहन सरतेशेवटी योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. त्यासाठी मोदींच्या नेतृत्वात पालघर लोकसभा मतदारसंघातून डॉ. हेमंत सवरा यांना बहुमतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com