वाडा तालुक्याला पंचनद्यांचे वरदान लाभले असतानाही पाण्याबाबत योग्य नियोजन केले जात नसल्याने या नद्यांचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. या तालुक्यात असलेल्या पाचही नद्यांवर १० किलोमीटर अंतरावर मोठे बंधारे बांधण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाने बंधारे बांधण्याबाबत चालढकल केल्याने शेतजमीनी कोरड्या पडण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.
तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी या बारमाही वाहणाऱ्या नद्या वाडा तालुक्यातून जातात. मात्र त्यांचे पाणी अडविले जात नसल्याने ते वाया जाते. गेल्या काही वर्षांपूर्वी या तालुक्यात औद्योगिकरण झाल्याने कारखानदारांनी आपले बस्तान बसवले आहे. कारखान्यात काम करण्यासाठी परप्रांतीय कामगार आल्याने तालुक्याच्या लोकसंख्येत वाढ झाली. कारखाने आले पण सरकारने त्यांना पाण्याची सोय करू दिली नाही.
कारखानदारांनी स्वतःच्या कुपनलिका खोदल्या. तसेच स्थानिकांकडून टॅंकरने ते पाणी घेत आहेत. कारखानदार शेतकऱ्यांच्या पाण्यात भागीदार झाले, मात्र पाण्यासाठी सरकारने जसे लक्ष द्यायला पाहिजे होते तसे दिले नाही.
तालुक्यात भात लागवडीखाली १५००० हजार हेक्टर क्षेत्र, रब्बी ३५०० हजार हेक्टर क्षेत्र याचबरोबर नागली, वरी, फुलशेती व फळशेतीसाठी काही हेक्टर क्षेत्र असताना फक्त ११०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. येथील हरभरा, मुग, वाल, तुर ही कडधान्ये प्रसिद्ध आहेत.
मात्र, तानसा नदीवर जास्त बंधारे नसल्याने किंवा बंधारे निकृष्ठ दर्जाचे झाल्याने या नदी किनाऱ्यावरील शेतकऱ्यांना शेती करता येत नाही. यासंदर्भात वाडा पंचायत समिती लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अजित जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले डाहे धरण होणे गरजेचे असून यामुळे अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येऊ शकेल. तसेच वैतरणा नदीवरील नागनाथ येथे बंधारा होणे गरजेचे असून या बंधाऱ्यामुळे परिसरातील अनेक गावांना पाणी मिळू शकेल. शेतकऱ्यांबरोबर उद्योजकांनाही या पाण्याचा फायदा होईल. म्हणून पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
वाडा तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. पाच नद्या या तालुक्याला लाभल्या आहेत. मात्र, सिंचनाच्या दृष्टीने पाहिले तर सर्वच राजकीय पक्ष व प्रशासन यांनी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. सिंचन क्षेत्र वाढवणे गरजेचे आहे.
- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते
------
सरकारने प्रत्येक गावात नळपाणी योजना मंजूर केल्या असून त्यांची कामे सुरू आहेत. तानसा नदी किनाऱ्यावरून अनेक गावात पाणी नेण्यात येणार आहे. मात्र, नदी आत्ताच कोरडी पडत असल्याने या योजना कितपत यशस्वी होतील याबाबत शंका आहे.
- विशाल पाटील, सदस्य, ग्रामपंचायत घोणसई मेट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.