Mumbai Latest Marathi News: नवी मुंबई गुन्हे पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने महालँड ग्रुपचे मालक पंडित राठोड यांच्यावर ३७ गुंतवणूकदारांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुंतवणूकदारांनी प्लॉट आणि घरे खरेदी करण्यासाठी एकूण १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरली होती.
दरम्यान राठोड यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नवी मुंबईतील नेत्यांनी या गुंतवणुकदारांना फूस लावली असल्याचा आरोप केला आहे.
याच नेत्यांनी आपल्याला यापूर्वी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता असाही आरोप राठोड यांनी केला. दरम्यान मनसेच्या नेत्यांनीही त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
उरण भाग लवकरच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकद्वारे (MTHL) मुंबईशी जोडला जाणार आहे, मात्र येथील भूखंडांची विक्री गेल्या अनेक वर्षांपासून वादात सापडली आहे.
या भागत बोगस विक्री आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप बिल्डर्सवरती आहे. दरम्यान या व्यवहारांमध्ये सहभागी असलेल्या डेव्हलपर्सनी हे आरोप नाकारले आहेत. मनसेकडून या प्रकरणी आक्रमक भूमीका घेण्यात येत आहे.
प्रकरण काय आहे?
राठोड यांच्याविरुद्ध नवी मुंबईतील बेलापूर पोलिस ठाण्यात घणसोलीचे रहिवासी प्रमोद आल्टे आणि अन्य ३६ गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल केला होता.
एफआयआरनुसार, तक्रारदारांनी उरण तालुक्यातील रांजणपाडा परिसरात २०१८ पासून महालँडने देऊ केलेल्या प्लॉट आणि घरांमध्ये गुंतवणूक केली होती. घर खरेदीदारांनी एकत्रितपणे एक कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती.
गुंतवणूकदारांना विक्रीसंबंधीत कागदपत्रे देण्यात येतील असे सांगण्यात आले होते, परंतु वारंवार पाठपुरावा करूनही ते मिळाले नाहीत.
कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे आणि बांधकाम देखील होत नसल्याने गुंतवणूकदारांनी त्यांचे व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि परताव्याची मागणी केली. मात्र, फक्त १२ गुंतवणूकदारांना अर्धे पेमेंट मिळाले तर इतर २५ जणांना काहीच मिळाले नाही. हिंदूस्तान टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
दरम्यान याप्रकरणी गुंतवणूकदार आल्टे यांनी सांगितलं की, मी २०१५ मध्ये ठाण्यातील महालँडच्या मेट्रो सिटी प्रकल्पात बुकिंग केले होते, त्यासाठी ४.५ लाख भरले होते आणि २०१८ मध्ये ताबा मिळण्याची हमी दिली होती. ते ताबा न देण्याबद्दल कारणं पुढे करत राहिले.
२०२० मध्ये, मला 2-BHK घरासह १ गुंठा जमीन देऊ करण्यात आली. पुन्हा वर्षभर जागेवर नोंदणी आणि कोणतेही काम झाले नाही. शेवटी जेव्हा मी माझ्यासारख्या इतरांचा एक गट तयार केला, तेव्हा मला सांगण्यात आले की मी कुठेही जाऊन तक्रार करू शकतो.
राठोड यांनी आरोप फेटाळले
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे आपल्यावरील सर्व आरोप पंडित राठोड यांनी फेटाळून लावले आहेत.
मनसे नेत्यांचा त्यांना ब्लॅकमेल करण्याचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न फसला होता. त्यामुळेच मनसे नेते गजानन काळे आणि अभिषेक भोसले यांनी गुंतवणूकदारांना फूस लावल्याचा आरोप पंडीत यांनी केला.
मनसे नेत्यांवर गंभीर आरोप
राठोड यांनी सांगितलं की, काळे आणि भोसले यांनी यापूर्वी माझ्याकडे १५ लाखांची मागणी केली होती, जी मी देण्यास नकार दिला.
त्यांनी माझ्या कार्यालयात घुसून काही कागदपत्रेही काढून घेतली, त्याच्या मदतीन त्यांनी काही गुंतवणूकदारांशी संपर्क साधला आणि माझ्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी त्यांना सांगितलं.
त्यांनी गुंतवणूकदारांना परतावा म्हणून मिळणार आहे त्यापेक्षा मोठ्या रकमेचे आश्वासन दिलं. तसेच राठोड यांनी गुंतवणूकदारांना परताव्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केला. तसेच ६० टक्के गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळाले आहेत असेही त्यांनी सांगितलं.
मनसे नेते काय म्हणाले?
मनसे नेते भोसले यांनी सांगितलं की, असे ३०० ते ४०० आणखी पीडीत गुंतवणूकदार असल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी सांगितलं की, या सर्व लोकांना MTHL जवळ फक्त दोन लाख रुपये गुंठा दराने जमीन ऑफर करण्यात आली. तसचे ४ गुंठे जागा घेतल्यास त्यासोबत १ गुंठा जमीन मोफत देण्याच्या जाहिरातींचे आमिष देखील दाखवण्यात आलं.
तसेच राठोड यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाबाबत विचारले असता भोसले यांनी ते फेटाळून लावले. ते म्हणाले की, आम्ही लोकांच्या हितासाठी काम करत आहोत. पोलिसांनी आवश्यक ती कारवाई न केल्यास आमचे नेते राज ठाकरे हे प्रकरण उचलून धरतील आणि मनसे स्टाईलने गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देऊ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.