पनवेल-: येथील परदेशी आळीतील एका विवाहित तरुणीने मानलेल्या भावाला सुपारी देऊन जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रिया नाईक असे मृत आईचे नाव असून याप्रकरणी मुलगी प्रणिता विवेक पाटील आणि निशांत पांडे या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी रविवारी अटक केली. बाहेर फिरण्यास तसेच मोबाईल वापरास आईकडून निर्बंध घातले जात असल्याच्या रागातून मुलीने हे पाऊल उचलल्याने तपासात समोर आले आहे.
मुलगी प्रणिता ही विवाहित असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. पतीसोबत न पटल्याने ती दोन वर्षांपासून पनवेल येथे माहेरी राहण्यास आली आहे. या कालावधीत तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते; मात्र काही कारणास्तव ते प्रेमसंबंध तुटले होते. यादरम्यान आई प्रिया यांनी प्रणितावर बाहेर ये-जा करण्यास, फोनवर बोलण्यास बंधने घातली होती. ती बाहेर गेल्यास तिला सतत फोन करणे, मोबाईलची तपासणी करीत होती. आईच्या या निर्बंधांना ती वैतागली होती.