मुंबई : डिसेंबरच्या मध्यापासून सुरू झालेल्या तिसऱ्या लाटेमागे कोरोनाचा (Corona Third Wave) नवा व्हेरियंट ओमिक्रॉन (Omicron) असल्याचे सांगितले जात आहे. ओमिक्रॉनमुळे त्रस्त असलेले बहुतांश रुग्ण 3 ते 4 दिवसांत बरे होत असले तरी त्यानंतर काहींना अशक्तपणा, अस्वस्थता, डोके व अंगदुखीच्या तक्रारी असल्याचे शहरातील डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, डॉक्टरांनी सांगितले की याला पोस्ट-कोविड समस्या म्हणणे खूप घाईचे ठरेल, कारण हे लोक आताच बरे झाले आहेत. आता पुढील दोन-तीन आठवड्यांनंतरही या समस्या कायम राहतात का, हे पाहावे लागेल.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने खूप धुमाकूळ घातला. या आजारातून बरा होऊनही, अनेक रुग्ण कोविड नंतरच्या आरोग्याच्या समस्या जसे की निद्रानाश, न्यूरो-संबंधित समस्या, अस्वस्थता इत्यादी तक्रारी करत होते, ज्यामुळे लोकांना बराच काळ त्रास होत होता. ओमिक्रॉनचा त्रास झालेल्या लोकांनाही कोविड नंतरच्या समस्या असतील की नाही हे जाणून घेण्यासाठी शहरातील विविध डॉक्टरांशी बातचीत केली गेली.
महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले की, तिसर्या लाटेत कोविडची लागण झालेले आणि त्यातुन बरे झालेल्या काही लोकांना थकलेले आणि अस्वस्थ वाटत आहेत. ही समस्या आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही दिसून आली आहे. यापूर्वी, एखाद्याला संसर्ग झाल्यास, किमान 10 ते 14 दिवस अलगीकरणात ठेवले जात होते, परंतु आता 4 ते 5 दिवसांत ते बरे होतात आणि आयसोलेशन देखील 7 दिवसांत संपते. त्यानंतर ते पुन्हा ड्युटीवर रुजू झाले असले तरी वरील समस्या त्यांच्यात दिसून येत आहे. आता ही समस्या काही दिवस राहते की दीर्घकाळ राहते हे पाहावे लागेल.
"सध्या या आजारातून बरे होणाऱ्या लोकांमध्ये थकवा, शरीरदुखी, विशेषत: पाठदुखीची समस्या दिसून येत आहे. बर्याच वेळा तापासह शरीरदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते, जी बरी होण्यास थोडा वेळ लागतो. सध्या याला पोस्ट कोविड समस्या म्हणणे खूप घाईचे आहे. ठोस निरीक्षणासाठी किमान तीन आठवडे वाट पहावी लागेल. त्यानंतर आणखी काय त्रास होतो हे कळेल."
- डाॅ. तृप्ती गिलाडा, संसर्गजन्य रोग विशेषज्ञ, मसिना रुग्णालय
"तिसऱ्या लाटेत बाधित झालेले अनेक रुग्ण फाॅलो अपसाठी ओपीडीमध्ये येतात. आजारपणानंतर अशक्तपणा, थकवा जाणवणे आणि डोकेदुखी किंवा शरीर दुखणे अशी समस्या आहे. अशा परिस्थितीत, त्यांना मल्टीव्हिटामिन दिले जाते आणि पौष्टिक आहार घेण्यास सांगितले जाते जेणेकरून त्यांचे आरोग्य सुधारेल. सध्या, कोणताही मोठा पोस्ट कोविड प्रभाव दिसून आलेला नाही."
- डाॅ. विद्या ठाकूर ,मुख्य वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.