'वारांच्या गुगलीने' मांसाहारी खवय्यांचा हिरमोड; रविवारी गुरुपौर्णिमा तर बुधवारी संकष्टी...

Non-Veg-Food
Non-Veg-Food
Updated on

कल्याण : पावसाळा म्हटला की गरमागरम झणझणीत चिकन-मटणाचा रस्सा, सोबत तांदळाची भाकरी, मसालेदार तळलेले मासे आणि घराघरातून सुटणारा खमंग वास! असे काहीसे चित्र घरोघरी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मांसाहार करण्याचा योगच खवय्यांना साधत  नसल्याने चिकन-मटणावर मनसोक्त ताव मारणाऱ्या खवय्यांचा हिरमोड झाला आहे. झाले असे की मागील बुधवारी (ता. 1) आषाढी एकादशी,  रविवारी (ता. 5) गुरुपौर्णिमा, येत्या बुधवारी (ता. 8) पुन्हा संकष्ट चतुर्थी आल्याने श्रावण महिनाच्या तोंडावर चमचमीत मांसाहारी पदार्थ खाण्याच्या बेताचा बट्याबोळ झाला आहे. त्यात लॉकडाऊन घोषित केल्याने शुक्रवारच्या (ता. 3) संधीलाही खवय्यांना मुकावे लागले. 

आठवड्यातील बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तीन वार मांसाहारींसाठी खूप खास मानले जातात. इतकेच नाही तर या वारी विशेषतः कोळंबीसह सुरमई, पापलेट, रावस, वाव या माशांच्या किंमतीतही 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होत असते. मात्र गेल्या बुधवारी आषाढी आणि त्यानंतरच्या रविवारी गुरुपौर्णिमा आली. त्यात शुक्रवारीही माशांचे दर काहीसे स्थिर होते. येत्या बुधवारी तरी बेत 'होऊन जाऊ दे' असे मनसुबे असतानाच त्याच दिवशी संकष्ट चतुर्थी असल्याने 'दुधाची तहान ताकावर' असे म्हणत सोयाबीन रस्सा, पनीर भाजी, भरले वांगे आदी पदार्थांकडे खवय्यांनी आपला मोर्चा वळवला आहे.

श्रावण महिना जवळ येऊ लागला की वेध लागतात ते चिंबोरी, मटण-माशांच्या चटकदार, तर्रीदार पदार्थांचे. यंदा लॉकडाऊनमुळे अनेकांनी घरच्या घरीच विविध रेसिपीस बनवण्याचे बेत आखले होते. मात्र नॉनव्हेज प्रेमींचे खास वार हे त्यांना वारंवार गुगली देत असल्याने सोशल मीडियावर अनेकांनी उपरोधिक पोस्ट करून आपल्या व्यथा मजेशीर शब्दांत व्यक्त केल्या आहेत.

 
---अखेर ठरलं 
सध्या  मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली शहरात पावसाचा जोर वाढला असून लॉकडाऊनचेही कडक पालन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकही घराबाहेर पडणे शक्यतो टाळत आहे. 21 जुलैपासून ( मंगळवार ) श्रावणास प्रारंभ होत असून 20 जुलै (सोमवारी) आषाढ अमावस्या आहे. सोमवारी शक्यतो मांसाहाराचे सेवन केले जात नसल्याने रविवारी ( 19 जुलै) घराघरातून चिकन-मटण, माशांचा वास दरवळणार हे नक्की. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आपल्या जिभेच्या चोचल्यांना आवर घालत बहुतांश नागरिकांनी थेट 19 जुलैलाच मांसाहार करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे या कालावधीत मासे, चिकन-मटण यांचे भाव 25 ते 30 टक्क्यांनी पुन्हा वाढतील, असे बोलले जात आहे. 

सध्याचे मांसाहारी वस्तूंचे दर  (प्रतिकिलो) 
मोठी सुरमई -  1100 -1300
कोळंबी -  800 -900 
पापलेट ( 2 नग) - 400 
बोंबिल ( 7 नग) - 300 
चिकन   -  240 
मटण -  640 ते 660

जुलै महिन्यात लॉकडाऊन व वारांनीही गुगली दिल्यामुळे थेट 19 जुलैचाच  मुहूर्त साधत घरीच वेगवेगळ्या पदार्थ्यांचे बेत आखले आहेत. हिरमोड झाला खरा पण दुसरा पर्याय नसल्याने आम्ही मांसाहारी सोशल मीडियावर आमच्या भावना व्यक्त करत आहोत. 
- अभिषेक पवार, रहिवासी.

- जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात माशांची मागणी कमी झाली आहे.  ठरलेले वार आणि मांसाहारी यांचा एकत्रित योग्य जुळून येत नसल्याने  मागणीवर परिणाम झाला. मात्र, श्रावण महिन्यामुळे 15 जुलैच्या पुढे   माशांचे भाव काहीसे वाढण्याची शक्यता आहे. 
-ओम लोके, व्यावसायिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.