ठाणे ः शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, ग्राहकांकडून जादा भाडे आकारले जाऊ नये, यासाठी रिक्षांमध्ये मीटर बसवले गेले, परंतु मीटरच्या रिक्षाही प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी नेत नसल्याने प्रवाशांचा ताप काही कमी होताना दिसत नाही.
मीटरच्या रांगेत उभे असणारे रिक्षाचालकही लांबच्या भाड्यासाठी तासन् तास प्रतीक्षा करतात आणि जवळच्या भाड्यांना स्पष्ट नकार देतात. काही प्रवासी त्यांच्याशी भांडून हट्टाने रिक्षात बसतात, परंतु तरीही जवळचे भाडे नकोच आहे, रिक्षा सुरूच करणार नाही असे सांगत रिक्षाचालक तेथून हलत नाहीत. तक्रारी करा... नाही तर त्यांच्याशी भांडा, त्यांना काहीही फरक पडत नसल्याने रिक्षाचालकांची ही मनमानी थांबणार कधी, असा प्रश्न प्रवासी सध्या उपस्थित करीत आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर मीटरच्या रिक्षांची रांग आहे. येथून रिक्षा पकडण्यासाठी प्रवाशांची लांबच लांब रांग असते. या ठिकाणाहून आपल्याला हमखास रिक्षा मिळणार असे प्रवाशांना वाटत असतानाच जवळचे ठिकाण सांगताच रिक्षाचालक चक्क नकार देत पुढे जा, असे प्रवाशांना सांगतात. जवळचे भाडे असलेले अनेक प्रवासी येथून रिक्षा मिळणार नाही किंवा रांगेत उभे राहण्याचे टाळण्यासाठी बी केबीन येथून रिक्षा करतात; मात्र त्यांना तेथेही त्याच अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. जवळचे भाडे नाकारत घोडबंदर, हिरानंदानी है क्या तो बोलो, असे रिक्षाचालक त्यांना उलट उत्तर देत आहेत.
शहरात शेअर रिक्षाप्रमाणेच मीटर रिक्षाचालकांचीही सध्या मनमानी सुरूच आहे. जादा पैसे कमवण्यासाठी ते चार प्रवाशांऐवजी लांबचे भाडे घेणे पसंत करतात. याचा ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना जास्त त्रास होतो. काही कारणास्तव प्रवासी जवळचे अंतर असले, तरी वाहनाने प्रवास करू इच्छितात, रिक्षाचालकांना उगाच त्रास देण्यात त्यांना स्वारस्य नाही.
- लता दाभाडे, प्रवासी
१८ रुपये केवळ भाडे होणार असेल, अशा ठिकाणी रिक्षाचालक जाण्यास सपशेल नकार देतात. काही वेळेस नवखे प्रवासी दिसल्यास रिक्षा फिरवून नेली जाते, केवळ भाडे वाढण्यासाठी. त्यांना येथून रिक्षा का नेली तो रस्ता होता असे सांगितले तरी तेथून ट्रॅफिक असते, रस्ता चांगला नाही असे कारण दिले जाते. एकंदरित त्यांना जवळचे भाडे नको. तक्रार केली तरीही त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने ही मुजोरी काही संपताना दिसत नाही.
- वैभव सुतार, प्रवासी
Plunder by Rickshaw drivers in Thane
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.