डोंबिवली : भिवंडी येथील क्वारंटाईन सेंटरमधून दोन वर्षापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत अटक असलेल्या आरोपीने पलायन केले होते. मोटारसायकल चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेला सराईत चोर गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता.
गाझी दारा इराणी उर्फ जाफरी उर्फ सैय्यद (वय 27) असे अटक आरोपीचे नाव आहे. गाझी विरोधात चार मोक्काचे गुन्हे व मोटारसायकल व जबरी चोरीचे 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात गाझी याला सादर केले असता 27 जानेवारी पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खडकपाडा पोलिस ठाण्यात दाखल मोटार सायकल चोरीचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अनिल गायकवाड हे करीत होते. गुप्त बातमीदारामार्फत गायकवाड यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी मोहने येथील लहुजीनगर येथे येणार आहे.
त्यानुसार 23 जानेवारीला पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढण्यासाठी गाझीने पोलिसांवर मिरचीचा स्प्रे मारण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी झडप घातल गाझीला अटक केली.
गाझीकडे चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरी व जबरी चोरीची कबुली दिली. गाझी याच्याविरोधात दाखल 12 गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच चार मोक्कांतर्गत गुन्हेही गाझी याच्याविरोधात दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
मोक्का कायद्यांतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेला गाझी हा कोवित काळात टाटा आमंत्रा येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये होता. तेथून 32 व्या माळ्यावरुन मागच्या बाजूला असलेल्या पाईप वरुन खाली उतरत गाझीने पळ काढला होता.
दोन वर्षापासून पोलिस त्याच्या मागावर होते, परंतू तो पोलिसांना चकवा देत होता. गाझीकडून आत्तापर्यंत तीन मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच त्याच्याकडून मिरचीचा स्प्रे, दोन चाकू व एक एअरगन देखील जप्त करण्यात आली आहे.
कल्याण खडकपाडा पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आंबिवली येथील इराणी वस्तीमधील इराणी आरोपींच्या विरोधात फार्स आवळण्यास सुरुवात केली आहे. काही कुख्यात चैन स्नॅचरना पोलिसांनी बेड्या ठोकत त्यांच्या रवानगी जेलमध्ये केली आहे.
गाझी विरोधात खडकपाडा, कोनगाव, महात्मा फुले, मानपाडा, बदलापूर, भिवंडीमधील निजामपूर पोलीस ठाण्यात एकूण बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कल्याण जवळील आंबिवली येथील इराणी वस्ती ही नेहमीच पोलिसांच्या रडारवर असते. आत्तापर्यंत या वस्तीमधून अनेक सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. काही वर्षांपूर्वी हे इराणी चोरटे वस्तीतील साथीदाराच्या मदतीने चोऱ्या करत होते.
मात्र आता या इराणी चोरट्यांनी बिगर इराणी असलेल्या लोकांना आपले साथीदार बनवत चोऱ्या सुरू केल्याचे काही घटनांवरून दिसून येत आहे. खडकपाडा पोलिसांनी अटक केलेला गाझी हा जयकुमार राठोड याच्यासोबत चोऱ्या करत होता. राठोडा याला पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वीच अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.