मुंबई : अधिकृत पशुवधगृहाशिवाय अन्यत्र बकरे, मेंढ्या, डुकरे कापण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाटिकांना देवनार पशुवधगृहातूनच मटण घ्यावे लागणार आहे. देवनार कत्तलखाना ते शहराच्या कानाकोपऱ्यात मटण पोहोचवण्यासाठी जास्त वेळ लागणार असल्याने त्याच्या गुणवत्तेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
महत्त्वाची बातमी : ही बातमी वाचलीत का? एसटीच्या सवलती हव्या तर; स्मार्ट कार्ड हवेच!
महापालिकेने मुंबईतील 360 जणांना देवनार कत्तलखान्याव्यतिरिक्त दुकानांत बकरे कापण्याचे परवाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने अधिकृत पशुवधगृहाशिवाय इतरत्र बकरे कापण्यास प्रतिबंध केल्याने सर्व खाटिकांना आता देवनार पशुवधगृहातूनच मटण घ्यावे लागेल. संपूर्ण मुंबईसाठी हा एकच कत्तलखाना असल्यामुळे सर्वत्र ताजे मटण पुरवणे शक्य होणार नसल्याचे महाराष्ट्र खाटिक संघटनेचे म्हणणे आहे.
एक बकरा कापण्यासाठी सुमारे 20 मिनिटे लागतात. कापलेले मटण दुकानापर्यंत पोहोचवण्यासाठी जवळपास तीन तास लागतात. त्यानंतर मटण विकण्यासाठी तीन ते चार तास आवश्यक असतात. त्यामुळे देवनारमधील मटण विकण्यासाठी साधारणता सहा तासांपेक्षा अधिक तास लागू शकतात. कोणत्याही प्रकारचे मटण सहा तासांनंतर खाण्यासाठी अयोग्य होते. त्यामुळे देवनार कत्तलखान्यातून निघालेले मटण ग्राहकांना मिळेपर्यंत खराब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत आठवड्याला साधारणत: 57 हजार बकरे कापले जातात. शहरातील 360 परवानाधारकांना दुकानांतच बकरे कापण्याची परवानगी होती. त्यामुळे मुंबईतील निम्म्याहून अधिक बकरे या दुकानांतच कापले जात होते. त्यावर बंदी येण्याची शक्यता असल्याने देवनार पशुवधगृहातच बकरे कापावे लागतील. तेथे आधुनिक यंत्रणा असली, तरी आठ तासांत फक्त 6000 बकरे कापण्याची क्षमता आहे. त्यामुळे मागणीप्रमाणे व वेळेत ताजे मटण खवय्यांपर्यंत पोहोचवणे कसे शक्य होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
किलोचा दर हजारापर्यंत जाणार?
देवनार कत्तलखान्यातूनच मटण घेऊन जावे लागणार असल्याने वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. मटण खराब होऊ नये यासाठी बर्फाची गरज भासणार आहे. त्याचप्रमाणे बकरा कापून घेण्याचे शुल्कही भरावे लागणार आहे. या सर्वांच्या परिणामी मटण महागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या मटणाचा भाव सुमारे 560 रुपये किलो आहे. खर्चात वाढ झाल्यास मटणाचा भाव हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
देवनार कत्तलखान्यातून संपूर्ण मुंबईत ताजे मटण पोहोचवणे शक्य होणार नाही. मुंबईतील मांसाहारींना दररोज लागणारे 20 हजार बकरे तासाभरात कापणे अशक्यच आहे. देवनार कत्तलखान्यातून निघालेले मटण सहा तासांनंतर ग्राहकापर्यंत पोहोचणार असल्याने ते खराब होण्याचा धोका आहे. त्यातून कुणाला बाधा झाल्या जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे महापालिकेने विभागवार पशुवधगृहांची व्यवस्था करावी; त्यासाठी राज्य सरकारने ठराव करावा. या मागणीसाठी आम्ही पत्रव्यवहार करणार असून, लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत.
- लियाकत मोमीन, अध्यक्ष,
महाराष्ट्र खाटिक असोसिएशन
मागणीपेक्षा अधिक पुरवठ्याची क्षमता
पशुवधगृह नियमावली (2001) नुसार प्राण्यांचा वध अधिकृत कत्तलखान्यातच करावा लागतो. देवनार कत्तलखान्यात अत्याधुनिक यंत्रणा आहे. एक बकरा कापून देण्यासाठी केवळ 25 रुपये शुल्क आकारले जाते. प्राण्यांची वधपूर्व आणि वधोत्तर पशुवैद्यकीय तपासणीही केली जाते. दुकानापर्यंत मटण न्यायचे असल्याने येथेच बर्फविक्रीचा परवाना देण्यात आला आहे. मागणीपेक्षा अधिक चांगल्या दर्जाच्या मटणाचा पुरवठा करण्याची क्षमता देवनार पशुवधगृहाकडे आहे. अन्नसुरक्षा अनुज्ञापन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एपिडा यांच्या परवानग्याही मिळाल्या आहेत, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेंद्र शेट्ये यांनी दिली.
possibility of shutting illegal slaughterhouse of goats sheep pigs in mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.