कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी मुंबईत सुरू होतेय 'पोस्ट कोव्हिड ओपीडी'; जाणून घ्या सविस्तर माहिती...

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी मुंबईत सुरू होतेय 'पोस्ट कोव्हिड ओपीडी'; जाणून घ्या सविस्तर माहिती...
Updated on

मुंबई : मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून नव्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी, एखादा आजार उद्भवल्यास कोणते उपचार घ्यावे, तसेच  कोरोना संसर्गावर मात केलेल्या रुग्णांवर दिसून येणारे तत्कालिक आणि दीर्घकालीन परिणाम दूर करण्यासाठी मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलने 'पोस्ट कोव्हिड ओपीडी' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पोस्ट कोव्हिड ओपीडीचे काम क्लिनिकल असेसमेंट म्हणजे चिकित्सात्मक तपासणी, सायकोलॉजिकल इंटरव्हेन्शन किंवा मानसशास्त्रीय सल्लामसलत आणि रिहॅबिलिटेटिव्ह केअर म्हणजे पुनर्वसनात्मक देखभाल या तीन बाबींवर चालणार आहे. या आजारामुळे संसर्गाचा शरीरावर झालेला प्रभाव, रुग्णांच्या हालचाली, शारीरिक व्यायामांचा ताण सहन करण्याची शक्ती आणि स्नायूंचा कमकुवतपणा या गोष्टींवर किती परिणाम झाला आहे याचे मूल्यमापन करण्यासाठी शारीरिक पुनर्वसनही महत्त्वाचे आहे. शिवाय, कोविड-19 च्या तीव्र लक्षणांशी झगडलेल्या रुग्णांमध्ये दिसून येणाऱ्या पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर (PTDS) च्या समस्येवर उपचार करण्यामध्ये शारीरिक तपासणी मोठी भूमिका बजावू शकेल. 


पोस्ट ओपीडीत काय होईल?
पोस्ट कोविड-19 ओपीडीमध्ये रुग्णांच्या, विशेषत: आजाराने गुंतागुंतीचे स्वरूप घेतल्याने आयसीयूमध्ये दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांचे आरोग्याचे आणि पल्मोनरी फायब्रोसिस यांचेही मूल्यमापन केले जाईल. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यांसारख्या तक्रारी आधीपासूनच असलेल्या रुग्णांमध्ये या आजारांची तीव्रता पूर्वी किती होती व कोविड-19 ची लागण झाल्यानंतर ती किती प्रमाणात बदलली आहे हे जाणून घेण्यासाठी मूल्यमापन केले जाईल. या उपाययोजनांमुळे कोविड- 19 मधून बचावलेल्या ज्या रुग्णांना सरसरकट अशक्तपणा आणि निष्क्रियता जाणवते आहे, अवयवांमध्ये वेदना जाणवत आहेत व ज्यांच्या फुफ्फुसांचे कार्य संपूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू होण्यास अडचण येत आहे अशा रुग्णांना मदत होऊ शकेल. 

पोस्ट कोविड- 19 आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत कोविडमधून बचावलेल्या रुग्णांचे डिस्चार्जनंतर 14 व्या आणि 28 व्या दिवशी आणि त्यानंतर तिस-या आणि सहाव्या महिन्यामध्ये मूल्यमापन करेल. अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग असलेला हा बाह्यरुग्ण विभाग हॉस्पिटलमध्ये दर आठवड्याला बुधवारी आणि शनिवारी सुरू राहील. पुनर्वसन कार्यक्रमामध्ये कोविड-19 मधून ब-या झालेल्या व्यक्तींना कॉन्व्हल्सेन्ट प्लाझ्मा थेरेपीसाठी रक्तातील प्लाझ्मा दान करण्याविषयीही समुपदेशन केले जाईल. 

कोव्हिड-19 शी झुंज दिलेल्या रुग्णांमध्ये व्यायामाचा ताण सहन न होणे, झोपेचे वेळापत्रक बिघडणे, स्नायूंची हानी, भूक न लागणे असे काही लक्षणीय बदल झाल्याचे आढळून आले आहे. नैराश्य, निद्रानाश इत्यादी न्यूरोसायकियॅट्रिक परिणाम तर गंभीर आहेतच, पण यापैकी काही रुग्णांमध्ये आधीपासून असलेल्या इतर आजारांची स्थितीही खालावल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक रुग्ण आजारातून बरे होण्याच्या कोणत्या टप्प्यावर आहे यानुसार त्याच्या पुनर्वसनाची योजना आखावी लागेल व ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये रुग्णामध्ये दिसून येणा-या बदलांचे निरीक्षण करावे लागेल. 
- डॉ. राहुल पंडित, सदस्य, कोव्हिड टास्कफोर्स, महाराष्ट्र आणि संचालक, फोर्टिस हॉस्पिटल
---
मार्च महिन्यापासून आतापर्यंत 2000 हून अधिक कोव्हिड रुग्णांची देखभाल केली आहे. यात अतिगंभीर आजारी असलेल्या, क्रिटिकल केअरची गरज असलेल्या रुग्णांची टक्केवारी मोठी होती. आता पोस्ट कोव्हिड ओपीडीत बऱ्या झालेल्या रुग्णांना चिकित्सात्मक, मानसिक आणि पुनर्वसनात्मक देखभाल दिली जाईल. त्यांना पुन्हा एकदा पूर्वीसारखे आयुष्य जगण्यासाठी सक्षम बनवले जाणार आहे.'' 
- डॉ. एस. नारायणी, झोनल डायरेक्टर, फोर्टिस हॉस्पिटल्स, मुंबई.

----
संपादन : ऋषिराज तायडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.