पोल्ट्री व्यवसाय संकटात

संग्रहित
संग्रहित
Updated on

अलिबाग : कोरोना विषाणूबाबत समाजमाध्यमांवर अफवा पसरवणाऱ्या संदेशांमुळे चिकनच्या विक्रीत सुमारे 30 ते 40 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. रायगड जिल्ह्यात अनेकांनी चिकन खाणेही बंद केले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आला असून येथे काम करणाऱ्या 42 हजार कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्‍यता आहे. 

चीनमध्ये कोरोना विषाणूने 500 पेक्षा अधिक जणांचा बळी घेतला आहे. त्यानंतर प्रत्येक देशात खबरदारी घेण्यात येत आहे. या संदर्भातील संदेश प्रसारित झाले आहेत; मात्र समाजमाध्यमांत चिकनमध्ये कोरोना विषाणू सापडल्याच्या अफवा पसरवणारे संदेश प्रसारित झाल्याने मांसाहाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

बर्ड फ्ल्यूची साथ राज्यात सुरू झाल्यानंतर मांसाहाऱ्यांनी चिकन खाणे सोडले होते. आता कोंबड्यांच्या संसर्गाने कोरोना विषाणूची लागण होते, असा समज पसरल्याने पुन्हा एकदा कोंबड्या व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे. एरवी चिकन दुकानांवर असलेली गर्दी आता बुधवार आणि रविवारीही दिसत नाही. त्यामुळे त्याची विक्री सुमारे 30 ते 40 टक्‍क्‍यांनी घसरली असून किमतीत किलोमागे 20 रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारातही भाव कमी झाले आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यात भातशेतीत फारसे उत्पादन मिळत नसल्याने जोडव्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय चालविला जात आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे तीन हजार पोल्ट्री व्यावसायिक आहेत. या व्यवसायातून पाच लाखांहून अधिक जणांना रोजगार मिळत आहे. त्यात 42 हजार कामगार प्रत्यक्षात पोल्ट्रीमध्ये काम करत आहेत.

पिल्लांना खाद्यपदार्थ देणे, त्यांची देखभाल करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, अशी अनेक प्रकारची कामे कामगारांमार्फत केली जातात. परंतु कोरोनाचा संसर्ग कोंबड्यामुळे होत असल्याची अफवा गेल्या पंधरा दिवसांपासून समाजमाध्यमांवर सुरू असल्याने नागरिकांनी चिकन खाणेच बंद केले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आला आहे. या व्यवसायातून कोट्यवधीची होणारी उलाढाल लाखो रुपयांवर आली आहे.

चिकन बिनधास्त खा! 
चिकनमधून कोरोनाचे संक्रमण मानवात होत नाही. त्यामुळे चिकन आहारासाठी पूर्णपणे सुरक्षित असून चिकनमधून कोरोना विषाणूचा संसर्ग होत नाही. तसा अहवाल आरोग्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी चिकन खाण्याबाबत समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्‍वास न ठेवता बिनधास्तपणे चिकन खावे, असा सल्ला रायगडचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिला आहे.  

काही समाजकंटक समाजमाध्यमांद्वारे कोरोना विषाणू कोंबड्यांमध्ये असल्याच्या अफवा पसरवत आहेत. या अफवामुळे ब्रॉयलर कोंबड्यांच्या बाजारात भावात मोठी घट झाली आहे. या अपप्रचारामुळे मोठा आघात झाला आहे. त्याचा परिणाम पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर होऊ शकतो. अनेकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अफवा पसरविणे थांबविण्यात यावे. 
- कुणाल पाथरे, संचालक, कुक्कूच कू, पोल्ट्री फार्म 

शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जात होता. आता या व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे अधिक संशोधन करून चिकनमधील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे प्रयत्न झाले आहेत. या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विविध संस्थांनी कोरोना विषाणूचा प्रसार चिकनमुळे होत नसल्याचा खुलासा केला आहे. समाजमाध्यमांवरील चुकीच्या संदेशामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात आला आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचा सुमारे 42 हजार कामगारांचा रोजगार धोक्‍यात आला आहे. 
- डॉ. सुबोध नाईक, प्रभात पोल्ट्री फार्म, अलिबाग


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.