अलिबाग : महापारेषणच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रात वीजपुरवठा सोमवारी (ता. 12) सकाळी 10.15 वाजता अचानक खंडित झाला. अलिबाग, पेण, खोपोली परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल पाच तासांनी सुरळीत झाला. तर काही भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महापारेषणचे अभियंते कर्मचारी करत आहेत.
कळवा-पडघा येथील महापारेषणच्या भौगोलिक माहिती प्रणाली केंद्रात सर्किट-1 ची देखभाल दुरुस्ती सुरू होती. याच वेळेस सर्व भार सर्किट-2 वर आल्याने हे सर्किट अचानक बंद झाले. त्यामुळे मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा, पडघा, खारघर ट्रान्सफॉर्मर वाहिनी बंद झाल्या. उरण वायू विद्युत केंद्रातील सर्व संच एससी बिघाड झाल्याने बंद झाला. खारघर-तळोजा आणि पेण वाहिनी बंद झाली. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून काही भागांत वीजपुरवठा पूर्ववत केला.
कळवा-खारघर येथील जंपर ब्रेकडाऊन झाला होता. तो दुपारी 2.30 वाजता सुरू करण्यात आला. त्यापूर्वी एमएमआरडीए क्षेत्रात येणाऱ्या अलिबाग, पेण, खोपोली, कर्जत, माथेरान या नगरपालिका आणि त्याच्या परिसरातील ग्रामीण भागात वीज गायब झाली होती. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य भागांत वीजपुरवठा सुरू होता.
झालेला बिघाड
400 के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-1 ही 12 ऑक्टोबरला पहाटे 4 वाजून 33 मिनिटाला ओव्हर व्होल्टेजमुळे बंद झाली. इन्सुलेटर बदलण्यासाठी ही वाहिनी बंद ठेवली. 400 के.व्ही. पडघा-कळवा वाहिनी-2 सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी बिघाड झाल्याने बंद झाली. मनोरा लोकेशन क्रमांक-1007 येथे वाहिनी तुटून पडली होती. मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडत असल्याने 400 के. व्ही. तळेगाव पॉवरग्रीड- वाहिनी खारघर येथून सकाळी 10 वाजून 2 मिनिटांनी बंद करण्यात आली. यामुळे कळवा व खारघर येथील 400 के.व्ही.च्या दोन्ही लाईनमध्ये बिघाड झाल्याने टाटाकडून येणारा 500 मेगावॉटचा वीजपुरवठा बंद झाला.
वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कामसुध्दा युध्दपातळीवर सुरू आहे. ट्रॉम्बे बस ऊर्जित केली असून वीज निर्मिती सुरू करण्यात येत आहे. तसेच रेल्वेचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत करण्यास सायंकाळचे पाच वाजतील, अशी शक्यता आहे.
- ममता पांडे,
जनसंपर्क अधिकारी, महापारेषण विभाग, भांडूप
----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.