रोहा : लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे; मात्र राज्य सरकारच्या पणन विभागाने सुरू केलेल्या ऑनलाईन नोंदणीचा रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी सुखावले आहेत.
या वर्षी लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ गाठता न आल्याने माल शेतातच कुजला. पूर, ओला दुष्काळ, परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम अशा विविध कारणांनी शेतकऱ्यांचे यंदा सातत्याने नुकसान होत होते. त्यातच आता आंब्याचा हंगाम सुरू होत असताना कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे दरवर्षी आयोजित केले जाणारे आंबा महोत्सव यावर्षी स्थगित केले आहेत.
अनेक कृषीमालाच्या बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. यावर मात करण्यासाठी राज्याच्या पणन विभागाने https:// www.asamb.com या संकेतस्थळांवर buyer seller information या लिंकवर शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. या लिंकवर शेतकऱ्यांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आंब्याची जात, विक्रीस उपलब्ध साठा व किंमत अशी माहिती नोंदवणे गरजेचे आहे. ग्राहक या लिंकद्वारे थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करू शकतील. हा व्यवहार थेट शेतकरी व ग्राहक यांच्यात होणार असल्याने आंबा शेतकऱ्याच्या शेतातून थेट ग्राहकाच्या घरात पोहोचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळणार असून, ग्राहकाला रास्त भावात चांगल्या प्रतींचा आंबा उपलब्ध होणार आहे. आंबा वाहतुकीसाठी कृषी विभाग, तसेच वाहतूक शाखेद्वारे शेतकऱ्यांना वाहतूक परवाना मिळणार असल्याने शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकाच्या दारात नेता येणार असल्याचे जिल्हा पणन विभागाचे अधिकारी तुषार जंगम यांनी सांगितले.
जिल्ह्यात 42 हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. त्यापैकी 14 हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. दरवर्षी जिल्हाभरात 21 हजार मेट्रिक टन आंबा उत्पादन घेतले जाते.
या वर्षी विविध नैसर्गिक कारणांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ऐन आंब्याच्या हंगामात लॉकडाऊन सुरू आहे; मात्र पणन विभागाच्या ऑनलाईन विक्रीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
- दगडू बामुगडे, खजिनदार, बळीराजा शेतकरी संघटना, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.