Radhakrishna Vikhe Patil - पशुवैद्यकीय सेवा थेट पशुपालकांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी कटिबद्ध होतो. त्यासाठी आवश्यक असलेल्या ८० फिरत्या पशुवैद्यकीय पथकांची महत्वकांक्षी सेवा आजपासून कार्यान्वित करण्यात येत असल्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले असुन, मुंबईतील विधानभवन प्रांगणात पार पडलेल्या शुभारंभ कार्यक्रमावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
केंद्र सरकार पुरस्कृत योजनेतील पशुस्वास्थ्य आणि रोग नियंत्रण या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात मुंबईसह राज्यभरात दिल्या जाणाऱ्या ८० फिरत्या पशुवैद्यकीय पथकांपैकी ५ पथकांचे प्रातिनिधिक स्वरुपात आज मुंबईतील विधानभवनाच्या प्रांगणात उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार समाधान अवताडे, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास सचिव वीरेंद्र सिंह, आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी जीपीएस प्रणालीयुक्त फिरते पशुवैद्यकीय पथक राज्य शासनामार्फतचा एक अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण निर्णय आहे. १९६२ या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून राज्यस्तरावर स्थानिक कॉल सेंटरद्वारे पशुपालकांच्या फोन कॉलनुसार पशुपालकांच्या दारापर्यंत उत्कृष्ठ दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यातील पशु आरोग्याच्या बाबतीत आत्ताची ८० आणि त्यासोबतच टप्प्याटप्प्याने येणारी एकूण ३२९ फिरती पशुवैद्यकीय पथके महत्वाची भूमिका बजावणार आहेत. या पशुचिकित्सा पथकांसाठी पदवीधर पशुवैद्यक, पदविकाधारक पशुवैद्यक तसेच वाहनचालक तथा मदतनीस यांची नेमणूक केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागामध्ये तसेच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे. काही वेळा दळणवळणाच्या सोई अपुऱ्या आहेत. अशा तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे विखे पाटील म्हणाले .
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.