अलिबाग : काही क्षणांतच डोंगराच्या पोटात गायब झालेले महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळिये गाव नव्याने आकार घेत आहे. भूकंपरोधक आणि तापमान संतुलित राखणारी घरे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वीज, रस्ते आणि इतर नागरी सुविधांसह अद्ययावत गावाची संकल्पना ग्रामस्थांनाही पसंत पडत असून इथे उभारण्यात येणारी २७१ घरे लवकरच पूर्ण होऊन दिवाळीपर्यंत सर्व कुटुंबे आपल्या नवीन घरात राहायला जातील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरड कोसळण्यापूर्वी तळिये गाव दरडग्रस्त गावांच्या यादीतही नव्हते. त्यामुळे दरडी रोखून ठेवण्यासाठी गावात कोणत्याच उपाययोजना केल्या नव्हत्या. २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीत गाव डोंगराखाली गाडले गेले आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली ६६ घरे नष्ट झाली. या दुर्घटनेत ८७ जणांचा बळी गेला.
सध्या येथे कोणीही राहत नाहीत. पुन्हा त्याच ठिकाणी घरे बांधण्यास ग्रामस्थही तयार नाहीत, त्यामुळे गावापासून काही अंतरावरच एका सुरक्षित ठिकाणी नव्याने तळिये गाव वसवण्यात येत आहे.राज्य सरकारच्या प्रयत्नांतून आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर निधीतून दरडग्रस्त कुटुंबांची तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था केली. दुसरीकडे ग्रामस्थांच्या पुनर्वसनावर सरकारने लक्ष केंद्रित केले अाहे.
मूलभूत सुविधांची कामे सुरू
घरांची जबाबदारी म्हाडाने घेतली आहे, तर मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली असून त्याची अंमलबजावणी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जात आहे. गावासाठी पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, सांडपाणी व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर अशा सुविधा दिल्या जाणार असून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सुरक्षित घरांची निर्मिती
संपादित केलेली जागा गावापासून जवळच एका पठारावर आहे. प्रत्यक्ष दरडीखाली नष्ट झालेली ६६ आणि उर्वरित घरे अशा एकूण २७१ कुटुंबांसाठी घरे बांधण्यात येत आहेत. प्रत्येक कुटुंबाला ६२३ चौरस फुटांची घरे दिली जाणार असून ती वैशिष्ट्यपूर्ण असतील. ही घरे नैसर्गिक आपत्तीचा सामना करणारी, भूकंप अवरोधक असतील. शिवाय, तापमानाचे संतुलन राखणारी असतील. याकरिता घरांच्या छपरासाठी पफ पॅनलचा वापर करण्यात येत आहे.
सध्या घरांच्या पुनर्वसनाचे काम वेगाने सुरू आहे. बांधकाम चांगले होत आहे; मात्र आम्हाला पूर्ण काम झालेले एक मॉडेल घर पाहण्याची प्रतीक्षा आहे. ते पाहिल्यानंतरच आम्हाला मिळणाऱ्या घराची कल्पना येऊ शकेल. ते मॉडेल लवकर बनवावे, मात्र सध्या तरी कामाबाबत समाधानी आहे.
- विजय पांडे, तळीये ग्रामस्थ
तळियेतील २७१ कुटुंबांसाठी म्हाडातर्फे घरे बांधण्यात येत आहेत. प्रत्येक कुटुंबाला ६२३ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. सध्या १२० घरांचा पाया व भिंती उभारण्याचे काम सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरे बांधली जात आहेत. या महिनाअखेर २०० घरांचे प्राथमिक काम पूर्ण होईल.
- किरण शिंदे, कनिष्ठ अभियंता, म्हाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.