मुंबई : रायगड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या हितरक्षणाकडे त्यांच्याच विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्याच पतसंस्थेकडून लाभांश वेळेवर मिळत नाही. तीन महिने होऊनही लाभांश मिळाला नसल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी सोसायटीचे अध्यक्ष असतानाही सुमारे दोन हजार कर्मचारी 80 लाखांच्या लाभांशापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.
रायगड जिल्हा पोलिस कर्मचारी सहकारी पतपेढी 1918 मध्ये सुरू झाली. छोट्या बैठ्या कौलारू घरातून कामकाज चालवल्या जाणाऱ्या या सोसायटीचे अद्ययावत कार्यालय उभारण्यात आले आहे. स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झालेल्या या पतसंस्थेकडून जिल्ह्यातील सुमारे दोन हजार पोलिस कर्मचाऱ्यांना कर्जाच्या स्वरूपात पाठबळ मिळते.
पतसंस्थेला झालेल्या फायद्यातील 10 टक्के रक्कम लाभांशाच्या स्वरूपात सदस्यांना एप्रिलपर्यंत दिली जाते. परंतु, काही वर्षांपासून लाभांश वेळेवर मिळत नसल्याचा आरोप केला जातो. सुमारे 80 लाखांच्या लाभांशाचे वाटप केले जाणे अपेक्षित आहे. परंतु, 20 टक्के म्हणजे 16 लाख रुपये कल्याणकारी कामासाठी देण्याची सक्ती करण्यात आल्याने लाभांश मिळण्यास दिरंगाई होत असल्याची चर्चा सुरू आहे. लाभांशाची रक्कम मिळत नसल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांतून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. दरम्यान, लाभांशाची रक्कम सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सभेत देण्यात येईल, असे रायगड जिल्हा पोलिस कर्मचारी सहकारी पतपेढी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पतसंस्थेमधील 20 टक्के लाभांश कल्याणकारी कामासाठी द्यावा, असा निर्णय महासंचालक कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
- अनिल पारसकर, पोलिस अधीक्षक
मी रायगड जिल्हा पोलिस कर्मचारी सहकारी पतपेढीचा चेअरमन असलो, तरी जास्त लक्ष देत नाही. पोलिस कर्मचाऱ्यांना लाभांश मिळाला की नाही, हे मला माहीत नाही.
- व्ही. जे. पांढरपट्टे, अध्यक्ष, रायगड जिल्हा पोलिस कर्मचारी सहकारी पतपेढी तथा पोलिस उपअधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.