माणगावः कोरोनाच्या साथीचा फटका जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिकांना हळूहळू बसत असून, जिल्ह्यातील कलिंगड व्यवसाय ठप्प झाला आहे. उठावाअभावी माल पडून राहिल्याने भावात 50 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
नोव्हेंबर ते मार्च हा जिल्ह्यातील कलिंगड लागवडीचा व उत्पादनाचा हंगाम म्हणून ओळखला जातो. या हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात कलिंगड उत्पादन घेतात व विक्री करतात. या वर्षी नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसाने कलिंगड शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कलिंगड पिकाऐवजी अन्य भाजीपाला शेतीला प्राधान्य दिले होते.
काही शेतकऱ्यांनी धाडस करून कलिंगड शेती केली. योग्य हवामान राहिल्याने या वर्षी कलिंगडाचे पीकही चांगले आले आहे. उत्पादन कमी व मागणी जास्त राहिल्याने मार्चमध्ये तयार झालेल्या कलिंगड शेतीला चांगला भाव मिळाला आहे. दर वर्षी एक ते सात हजार मिळणारा भाव या वर्षी एका टनामागे 12 ते 13 हजार मिळत होता. त्यामुळे कलिंगड शेतकरी आनंदले होते; मात्र शेतकऱ्यांचा आनंद क्षणिक ठरत असून, जगभरात पसरत असलेल्या कोरोनाच्या साथीचा फटका कलिंगड व्यापाराला बसत आहे.
कोरोनाच्या भीतीने नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. वाहतूक थांबली आहे. त्यामुळे कलिंगडाची मागणी कमी झाली आहे. व्यापाऱ्यांनी नवीन माल खरेदी करण्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तयार झालेला कलिंगड शेतातूनच पडून आहे. रस्त्यावरून कलिंगड विकणाऱ्या व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसत असून, कलिंगड विक्री होत नसल्याचे त्यांनी सांगितले. वाढणाऱ्या उष्णतेमुळे कलिंगड फळाला धोका असतो. जास्त दिवस ते ठेवता येत नाही. त्यामुळे कोरोना आणि वाढती उष्णता या दुहेरी संकटात कलिंगड शेतकरी सापडले असून, कोरोनामुळे प्रचंड नुकसान होत आहे.
गेल्या दहा दिवसांपूर्वी कलिंगडाला चांगली मागणी होती. त्यामध्ये 12 ते 12 हजार भाव होता. कोरोनाची साथ वाढू लागली व वाहतूक मंदावली. पर्यटक कमी झाल्यामुळे मालाला मागणी नाही. परिणामी माल पडून आहे.
- संदीप खडतर, अध्यक्ष, आत्मा शेतकरी संघटना
या वर्षी उत्पादन कमी झाल्याने कलिंगडाला चांगला भाव मिळत होता; मात्र कोरोनामुळे मागणी एकदम कमी झाली आहे. भाव गडगडले आहेत.
- रामदास जाधव, शेतकरी व विक्रेता, माणगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.