लाॅकडाऊन इफेक्ट... मोठ्या `थांब्या`ने मोटरमनची झोप उडाली!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Updated on

मुंबई : मुंबईहून पहिली लोकल ठाण्याकरिता रवाना झाली तो दिवस होता, 16 एप्रिल... देशातील सर्वात मोठा रेल्वे संप सुरू झाला तो 8 मे रोजी. अशा दोन महत्त्वाच्या दिवशी देशातील जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वे सेवा ठप्प आहे. त्याला कारण आहे कोरोनामुळे लागू असलेली संचारबंदी. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ती कधी संपेल याचा नेम नाही. दरम्यानच्या काळात उपनगरी रेल्वेवर काम करणारे मोटरमनच्या जीवनाचे गणित बिघडले आहे. एवढ्या मोठ्या ब्रेकची त्यांना सवय नसल्याने त्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली आहे. 

वाचा : दहावी आणि बारावीच्या निकालांबाबत मोठी बातमी, जाणून घ्या...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतरही काही तासांत रेल्वे सेवा सुरू झाली होती, पण लॉकडाऊनमुळे ती थांबली आहे. `26-11 चा हल्ला झाला तेव्हा त्यातून थोडक्यात वाचलो होतो. पण त्यानंतरही काही तासांत उपनगरी सेवा सुरू झाली होती. आम्ही सर्व आमच्या कामावर रुजू झालो होतो. आता मात्र पुन्हा कधी काम सुरू होणार असाच प्रश्न पडला आहे,` असे मुंबईतील एका मोटरमनने सांगितले. त्यांच्या मताशी अनेक मोटरमन सहमत होते.
 
मोठी बातमी : वैद्यकीय प्रमाणपत्रांशिवायही स्थलांतरितांना घरी जाता येणार

मुंबईतील उपनगरी सेवा पूर्णपणे बंद पडल्याच्या घटना खूपच तुरळक आहेत. 26-11 च्या हल्ल्यानंतरही लोकल सुरू होत्या. 1992 च्या दंगलीतही त्या धावत होत्या. 2005 च्या भयावह पुराच्या वेळी सेवा 72 तास बंद होती, पण सध्याचा लाॅकडाऊन ब्रेक मोटरमनसाठी विरळाच आहे. मुंबईतील अभ्यासक 1974 चा रेल्वे संप सोडल्यास प्रथमच लोकल सेवा एवढी दीर्घकाळ बंद असल्याचे सांगतात. जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली झालेला रेल्वे संप 8 मे 1974 रोजी सुरू झाला होता. तो वीस दिवस चालला होता. यंदा त्या संपाच्या दिवशीही म्हणजे 8 मे रोजी रेल्वे बंद असणार आहे.
 
महत्त्वाचं : वरळी कोळीवाडा खरंच कोरोनामुक्त झालाय का?

मुंबईची उपनगरी सेवा दोन हजार मोटरमन अव्याहतपणे सुरू ठेवत असतात. मध्य आणि हार्बर रेल्वेवरील  800 ते 1000 मोटरमन 1700 फेऱ्या करतात. पश्चिम रेल्वेवरील 500 मोटरमन 1300 फेऱ्या करतात. त्यांना क्वचितच सुटी असते. त्यांच्यासाठी दोन फेऱ्यांतील ब्रेक हीच सुट्टी. त्यांचा ब्रेक कधी चाळीस तासांपर्यंत असतो तर कधी काही तासांचा. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी सध्याचा चाळीसहून जास्त दिवसांचा ब्रेक त्रासदायकच आहे. 

ना थकवा ना झोप!
सेकंदावर चालणाऱ्या मोटरमनना संचारबंदीमुळे कित्येक दिवस घरी बसावे लागले आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट ड्युटीशी निगडित असते. लॉकडाऊनमुळे सुरुवातीस काही दिवस बरे वाटले, पण त्यानंतर त्रास होत आहे. ड्युटीवर असताना एकाग्रता आवश्यक असते. त्यामुळे थकवा येत असे. झोपही लागत असे, पण आता ड्युटी नसल्याने ना थकवा ना झोप, अशी अवस्था झाल्याचे अनेक मोटरमनने सांगितले. 

कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरूच
रेल्वेचे आधिकारी उपनगरी सेवा पूर्ण बंद नसल्याचे सांगतात. प्रवाशांसाठी सेवा बंद असली तरी आमच्या कर्मचाऱ्यांना घेऊन येण्यासाठी गाड्या सुरू आहेत. मालगाडीवर काम करणाऱ्यांसाठी, रेल्वे डॉक्टरांसाठी आणि इतरांसाठी चर्चगेट ते विरारदरम्यान दिवसाला सहा फेऱ्या होत आहेत. त्याचबरोबर उपनगरी लोकलची कारशेडमध्ये वाहतूक सुरू आहे. रेकमधील दोष दूर करण्यासाठी हे आवश्यक आहे, असे आधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.