Latest Mumbai News: विधानसभा निवडणुकीत खरी लढत ही महायुती विरुद्ध मविआ अशी असली तरी मुंबईतील ३६ जागांपैकी २५ जागांवर मनसेने उमेदवार दिले असून या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने अचानक महायुतीवर टीकेचे आसूड ओढणे सुरू केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीचे गुणगाण सुरू केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनीही राज ठाकरेंची वेळोवेळी भेट घेतली. त्यामुळे ठाकरे हे महायुतीच्या सोबत राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, मात्र मनसेच्या या बदललेल्या भूमिकेमुळे महायुतीतील नेते भ्रमात आहेत. राज्यभरात जवळपास १०० ठिकाणी मनसेने उमेदवार उभे केले आहेत.