राज ठाकरेंची उत्तरसभेत जोरदार फटकेबाजी; वाचा सविस्तर

गुढीपाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याला चांगलाच विरोध दर्शविला होता.
MNS Chief Raj Thakreay
MNS Chief Raj ThakreaySakal media
Updated on

संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हेच कळत नाही

संजय राऊत शिवसेनेचे आहेत की, राष्ट्रवादीचे हेच कळत नाही असे म्हणत आपल्याला ईडीची पुन्हा नोटीस आली तर, सामोरं जाईन, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशामध्ये अनेक वर्षांपासून जाती आहेत. मात्र, 1999 ला ज्यावेळी राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण करायला लावल्याचे राज यांनी सांगितले. संभाजी ब्रिग्रेडसारख्या संघटना यांनीच तयार केल्या असे म्हणत राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच राज्यात जातीयवाद वाढल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. शरद पवार कधीही शिवजी महाराजांचं नाव घेत नाहीत ते भाषण करताना नेहमी तेव्हा शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात.

राज्यातील सर्व मशिदींवरचे भोंगे 3 मे पर्यंत उतरवा : राज ठाकरे

देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे 3 मे पर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असे सांगत त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर, हनुमान चालीसा लावणारचं असेदेखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाहीये. आम्हाला त्याची इच्छादेखील नाही. त्यामुळे १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी राज्य सरकारने चर्चा करावी आणि त्यांना सगळे भोंगे खाली उतरवण्यास सांगावे.

अजित पवारांसाठी खास तीन व्हिडिओ 

सभेतील भाषणादरम्यान, राज ठाकरेंनी त्यांच्या स्वतःच्या विधानांचे तीन व्हिडिओ खास अजित पवारांसाठी लावले यामध्ये त्यांनी मशिंदींवरील भोग्यांबाबत भूमिका मांडली होती. यावेळी राज ठाकरे यांनी 28 जुलै 2018, 1 ऑगस्ट 2018, 23 जानेवारी 2020 मधील राज ठाकरें यांनी भोंग्याबाबत त्यांची भूमिका मांडली होती.

भुजबळांवर हल्लाबोल 

भाषणादरम्यान, राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे भुजबळांना जेलमध्ये जावे लागले. दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेते भुजबळ होते.

मनसे विझलेला नाही समोरच्याला विझवत जाणार पक्ष - राज ठाकरे

मनसे हा विझलेला पक्ष असल्याचे जयंत पाटील म्हणतात. मात्र, मला त्यांना सांगायचे आहे की, जंतराव मनसे हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे. यावेळी राज ठाकरे यांनी जयंत पाटलांचा उल्लेख 'जंत' पाटील असा केला.

देशात समान नागरी कायदा आणा : राज ठाकरे

भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी आपण देशात समान नागरी कायदा आणण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा आणा असे आवाहन नरेंद्र मोदींना केले आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे असे ते म्हणाले.

अजित पवारांच्या घरी रेड पडली मात्र, सुप्रिया सुळेंच्या नाही 

राज ठाकरे म्हणाले की, अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरी रेड होते. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंना कंस जमलं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असे म्हणणारा पहिला माणूस मी होतो.

पंतप्रधान मोदींवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असे म्हणणारा पहिला माणूस मी होतो. त्यानंतर बाकीचे बोलले असे राज यांनी सांगितले.

मोदींना अभिनंदन करणारे ट्वीट माझे होते - राज ठाकरे

ईडीच्या नोटीसीनंतर ट्रॅक बदलाला असे अनेकांनी म्हटले, मात्र, मला ट्रॅक बदलावा लागत नाही. कास्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर मोदींचे अभिनंदन करणारे ट्वीट माझे होते असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

“माझा ताफा कुणीतरी अडवणार आहे, हे इंटेलिजन्स कळलं, पण…”

माझ्या सभेपूर्वी पोलिसांचा आपल्याला फोन आला त्यावेळी त्यांनी माझा ताफा काही छोट्या संघटना अडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना माझा ताफा अडवणार हे पोलिसांना कळलं मात्र, पवारांच्या घरी एसटी कर्मचारी जाणार हे पोलिसांना कळलं नाही का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थीत केला. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेकांनी तारे तोडल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरेेच हिंदुंचे खरे नेते होऊ शकतात - प्रकाश महाजन

राज ठाकरे हेच हिंदुंचे खरे नेते होऊ शकतात असे मत मनसेचे नेते आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरेंसाठी हिंदूत्त्व हेच सत्व असल्याचे ते म्हणाले. संजज राऊत मातोश्रीची नोकरी करतात अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्रीपदासाठी वडिलांचा शब्द पाळला नाही, अशी टीका महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

वसंत सेना ते पवार सेना मनसे नेते संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

वसंत सेना ते पवार सेना असा शिवसेनेचा प्रवास असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, शिवसेना हळूहळू संपत चालली असून, शिवसेना म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसू 'ढ' सेना असल्याचे ते म्हणाले. शिवसेना प्रमुखांचा विचार शिवसेनेकडून संपवला जात असल्याचेही ते म्हणाले.

निवडणुकीत मनसेची आठवण का होत नाही? 

कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी मनसेची दार उघडी होती. कामे असतात तेव्हाच मनसेची आठवण येते, मात्र निवडणुकांवेळी मनसेची आठवण का होत नाही? असा सवाल यावेळी वसंत मोरेंनी उपस्थित केला.

कोरोना काळात सरकारने जी कामं करायला हवी ती मनसेने केली : वसंत मोरे

राज्यात उद्बवलेला कोरोनाचा काळ आठवला तरी अंगावर काटा येतो असे म्हणत याकाळात सरकारनं जी कामे करायला हवी होती ती कामे करण्यास हे सरकार अपयशी ठरणल्याचा हल्लाबोल वसंत मोरे यांनी केला आहे. या जी काम करण्यात सरकार अपयशी ठरले ती सर्व कामे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.

ठाण्यातील उत्तरसभेतील राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी पुण्यातील मनसेेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी कोरोनाकाळात पुण्यात उद्भवलेल्या परिस्थिवर भाष्य करत पुण्यात रस्त्यावर सामान्यांसाठी केवळ आणि केवळ मनसचे कार्यकर्ते काम करत होते. तर बाकीच्या पक्षांचे नेत मंडळी घरात बसली होती. पुण्यात एक अॅम्बेसिडर फुटली आणि त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्राने ऐकला असे वसंत मोरे यांनी यावेळी सांगितले.

सभेसाठी मनसे कार्यकर्ते रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे येथे उत्तरसभा होणार आहे. यासभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या सभेसाठी राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर, डोंबिवली मनसे कार्यलयातून वाजत गाजत मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी डोंबिवलीहून ठाण्याला रवाना झाले आहेत.

उत्तर सभेत राज ठाकरेंच्याआधी वसंत मोरे करणार भाषण

गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा पार पडला होता. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याला चांगलाच विरोध दर्शविला होता. यावरून चांगलेच राजकारण तापले होते. त्यांच्या वक्तव्यावर पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. यामुळे त्यांना शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. यानंतर वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. आता ते आजच्या सभेत राज ठाकरे यांच्या आधी भाषण करणार असल्याची माहिती आहे.

Live : ठाण्यातील उत्तर सभेसाठी राज ठाकरे रवाना

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची थोड्यावेळात ठाण्यात उत्तर सभा (MNS Uttar Sabha) होणार असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दखल झाले आहेत. ठाण्यातील उत्तर सभेसाठी मनसेकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. तत्पूर्वी, मनसेकडून (MNS) सभेपूर्वी तीन टीझर रीलीज करण्यात आले होते. 9 एप्रिल रोजी मनसेकडून कारारा जबाब मिलेगा #उत्तर सभा अशी टॅग लाईन देत एक टीझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी ''वारं खुप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलेच आहे'' असा उल्लेख करत दुसरा तर, त्यानंतर लाव रे तो व्हिडिओ असा उल्लेख करत तिसरा टीझर रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याला चांगलाच विरोध दर्शविला होता. त्यानंतर राज ठाकरेंच्या भाषणावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे आजच्या ठाण्यातील सभेत या सर्व राजकीय प्रतिक्रियांना उत्तर देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज यांच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Raj Thackeray Uttarsabha Thane Live )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.