Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. राज ठाकरे लोकसभेत भाजपशी युती करणार, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार, अशा चर्चा होत होत्या. मात्र राज ठाकरे यांनी या सर्व अफवा असल्याचे आज गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले. शिवसेना प्रमुख व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. पण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आधीच्या राजकीय आठवणींना उजाळा देताना राज ठाकरे म्हणाले, ‘‘तेव्हा ३२ आमदार सहा-सात खासदार म्हणाले होते की आपण एकत्र बाहेर पडू. माझा दौरा मी सुरू केला. त्यांना वाटले मी काँग्रेसमध्ये जाईन. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितले होते की, मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. आता माझ्या मनात विचार नाही. उद्या पाऊल उचलले तर स्वत:चा पक्ष काढेन पण मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही.
"बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती पण त्यांना ते समजलेच नाही. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अथवा अध्यक्ष होणार नाही. मी जे ‘मनसे’ नावाचे अपत्य जन्माला घातले त्याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आता पक्षाला अठरा वर्षे झाली असल्याने मनाला दुसरा विचार देखील शिवत नाही,’’ असे ठाकरे म्हणाले.
लोकसभेची निवडणूक देशाची भवितव्य ठरवणारी-
‘‘ लोकसभेची आगामी निवडणूक ही देशाची भवितव्य ठरविणारी असून सध्या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी म्हणून आपण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या महायुतीला पाठिंबा देत आहोत,’’ अशी घोषणा करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागण्याचे आवाहन केले.
शिवाजी पार्क येथे आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. राज यांनी यावेळी जनतेकडून अपेक्षा व्यक्त करताना राजकीय व्यभिचाराला मान्यता देऊ नका असे आवाहन देखील केले. मी ‘मनसे’चाच अध्यक्ष राहणार असून शिंदे सेनेचा प्रमुख होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या दिल्लीतील भेटीवर भाष्य करताना राज म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला एकत्र येण्याबाबत विचारणा करत होते. त्यामुळेच मी शहा यांना फोन करून भेटण्यासाठी वेळ मागितली होती. त्याप्रमाणे मी त्यांना दिल्लीत जाऊन भेटलो. या भेटीत सगळे विषय निघाले. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवावी? येथपर्यंत प्रकरण आले.
"मी मात्र ‘मनसे’चाच अध्यक्ष राहण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांचे कौतुक केले होते. तसेच ते पंतप्रधान व्हावेत असे म्हणणारा मी पहिलाच आहे. मात्र त्यांचे जे निर्णय पटले नाहीत तेव्हा त्यांच्या विरोधात लाव रे तो व्हिडिओ म्हणत मीच २०१९ मध्ये उभा राहिलो होतो. आता महाराष्ट्राचा कॅरम चुकीचा फुटला आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात आहे? हेच कळत नाही. या परिस्थितीतून आपल्याला पुढे जाताना मार्ग शोधायचा आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.