पोटासाठी मृत्यूशी दोन हात करण्यास तयार! महामारीतही आरोग्य विभागातील भरतीला मोठा प्रतिसाद

पोटासाठी मृत्यूशी दोन हात करण्यास तयार! महामारीतही आरोग्य विभागातील भरतीला मोठा प्रतिसाद
Updated on


नवी मुंबई: कोरोनासारख्या महामारीच्या काळातही जीव धोक्यात घालून पोटाची खळगी भरण्यासाठी तब्बल दहा हजार पेक्षा जास्त बेरोजगारांचा महापालिकेच्या भर्ती प्रक्रीयेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. आरोग्य विभागातील विविध 11 प्रकारच्या संवर्गासाठी थेट मुलाखतीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो इच्छूक युवक-युवती भर्तीसाठी आले होते. त्यापैकी ज्यांना महापालिकेने आधीच टोकन क्रमांक दिला आहे अशांनाच प्रवेश देऊन बाकींना माघारी पाठवल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.    

टाळेबंदीमुळे नोकऱ्या गमावलेल्यां तरूणांची ससेहोलपट आज पार पडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या भर्ती प्रक्रीयेदरम्यान सर्वांनाच पाहायला मिळाली. महापालिकेची नोकरी पटकावण्यासाठी भर उन्हात धडपड करणाऱ्या होतकरू तरूणींची धडपड सकाळपासून महापालिका मुख्यालयाच्या आवारात सुरू होती. कोरोनामुळे वाढत्या रुग्णांना सेवा देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागात मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. एमबीबीएस, बीएएमएस आणि बीएचएएएस डॉक्टर, वॉर्डबॉय, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ओपरेटर, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, मेडीकल मायक्रोबायोलॉजिस्ट, स्टाफ नर्स अशा 11 सवंर्गासाठी तब्बल पाच हजार 543 जागांकरीता महापालिकेने थेट मुलाखतीद्वारे अर्ज मागवले होते. त्याकरीता महापालिकेने एक अधिकृत ई-मेल आयडी जाहीरातीमध्ये दिला होता. या ई-मेलवरील अर्ज भरल्यानंतर महापालिका संबंधित अर्जदाराला टोकन क्रमांक आणि मुलाखतीची तारीख व वेळ कळवणार होती. त्यानुसार संबंधितांनी मुलाखतीला येणे अपेक्षित होते. महापालिकेच्या जाहीरातीनुसार 20 जुलै पासून सकाळी 11.30 ते संध्याकाळी 5 या वेळेत मुलाखती होणार होत्या. त्यामुळे आज नवी मुंबई सहीत मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नगर आणि धुळे जिल्ह्यातून हजारो उमेदवार मुलाखतीसाठी महापालिका मुख्यालयाच्या आवारात आले होते. मुलाखतीला आलेल्यांपैकी टोकन क्रमांक दिलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात आला. मात्र ज्या उमेदवारांना प्रवेश नाकारला अशा तरुणींनी प्रवेशद्वाराजवळच गोंधळ घालण्यास सुरूवात केली. आम्हाला मुलाखतीला जायचे आहे आत प्रवेश द्या असे सर्वजण ओरडायला लागले. अखेर अतिरीक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी संतापलेल्या उमेदवारांची समजूत काढून त्यांना माघारी पाठवले.     

बोगस संकेतस्थळाचा फटका

नवी मुंबई महापालिकेने पाच हजार 543 जागांसाठी महापालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन जाहीरातींमध्ये केले होते. अर्ज केल्यावर ज्यांना टोकन क्रमांक मिळेल त्यांनीच मुलाखतीकरीता येणे असे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र काही उमेदवारांना मिळालेल्या चूकीच्या माहीतीवरून www.mahasarkar.co.in या संकेतस्थळावरील वेबलिंकवर अर्ज शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू हे संकेतस्थळच बोगस असल्याने अनेकांना नोंदणी अर्ज करता न आल्याने टोकन क्रमांकाअभावी मुलाखतीपासून मुकावे लागले.  

शेवटी रिकाम्या हातीच परतलो

कोरोनासारख्या महामारीच्या काळात उपासमार होत असताना नवी मुंबई महापालिकेची नोकरी भर्ती ही आमच्यासाठी पोट भरण्यासाठी सुवर्ण संधी होती. म्हणून आम्ही तिघी मैंत्रीणी कसेबसे दहा हजार रूपये जमवून धुळे जिल्ह्याचील धोंडाईचाहून नवी मुंबईत आलो. परंतू आमच्याकडे टोकन क्रमांकच नसल्याने आम्हाला महापालिकेने परत जाण्यास सांगितले. तीन दिवस पालिकेने दिलेली संकेतस्थळ सुरू होत नसल्याने आम्हाला अर्ज करता आला नाही. असे गरीब कुटुंबातील मुलाखतीसाठी आलेल्या सोनाली गिरासे यांनी सांगितले. 

नवी मुंबई महापालिकेच्या भर्ती प्रक्रीयेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पालिकेने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरच इच्छूकांनी संपर्क करायला हवा. काही उमेदवारांनी चूकीच्या संकेतस्थळाला भेट दिल्यामुळे त्यांचा गोंधळ झाला. परंतू डेटा एन्ट्री करीता फक्त उद्यापूरते संकेतस्थळ सुरू ठेवणार आहोत. 
सुजाता ढोले, अतिरीक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

----------------------------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.