सुशांतच्या आत्महत्येस कारण की... काय म्हणताहेत संजय राऊत, वाचा

सुशांतच्या आत्महत्येस कारण की... काय म्हणताहेत संजय राऊत, वाचा
Updated on

मुंबई :  अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर या आत्महत्ये प्रकरणी मुंबई पोलिस कसून चौकशी करताहेत. माध्यमांसह सोशल मीडियावर सुशांतच्या आत्महत्येविषयी चर्चा सुरू आहे. अशातच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून आज सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर सविस्तर भूमिका मांडली आहे. आजच्या सदरात राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. राऊत यांनी सुशांतच्या आत्महत्येस कारण की…  या लेखात सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरही ताशेरे ओढले. तसंच त्यांनी येत्या काळात जॉर्ज फर्नाडिस यांच्या बायोपिकमध्ये सुशांत सिंह राजपूत हा संभाव्य ‘जॉर्ज’ म्हणून डोक्यात असल्याचा खुलासा केला आहे. 

काय आहे संजय राऊत यांची भूमिका 

सुशांत राजपूत याने ‘धोनी’ चित्रपटात महेंद्रसिंग धोनीची भूमिका केली. हा चित्रपट गाजला. राजपूत याने इतर चित्रपटांत भूमिका केल्या. त्याने आत्महत्या केली तेव्हा त्याचे सहा चित्रपट निर्मात्यांशी करार झाले होते. मी स्वतः या क्षेत्राशी काही प्रमाणात संबंधित आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती संपल्यावर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर ‘बायोपिक’ करण्याचे ठरले. जॉर्ज यांची भूमिका करणारे चेहरे म्हणून ज्या दोन-तीन अभिनेत्यांची नावे समोर आली त्यात सुशांतचे नाव होते. धोनीमुळे तो माझ्या नजरेत होता. पण दोन दिवसांनी मला सांगण्यात आले, सुशांत उत्तम अभिनेता आहे. तो ही भूमिका लीलया पेलेल, पण सध्या त्याची मानसिक अवस्था चांगली नाही. तो डिप्रेशनमध्ये आहे. चित्रपटांच्या सेटवर त्याचे वर्तन तऱहेवाईक आहे. याचा त्रास सगळय़ांना होतोय. अनेक मोठय़ा प्रॉडक्शन हाऊसनी याच कारणांमुळे त्याच्याशी करार मोडले आहेत. सुशांतने स्वतःच स्वतःच्या करीअरची वाट लावली असे या जाणकाराचे सांगणे होते व त्यानंतर दोन महिन्यांत सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली. त्यामुळे पडद्यावरचा संभाव्य ‘जॉर्ज’ पडद्याआड गेला.

आत्महत्येचे मार्केटिंग!

संजय राऊत यांनी सुशांतच्या आत्महत्येचं मार्केटिंग केल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “एखाद्याच्या मृत्यूचा किंवा आत्महत्येचा ‘उत्सव’ कसा साजरा होतो, एखाद्या आत्महत्येचेही ‘मार्केटिंग’ कसे केले जाते याचे उत्तम उदाहरण म्हणून सुशांतसिंह प्रकरणाकडे पाहता येईल. जो उठतोय तो या प्रकरणात हात धुऊन घेतोय. त्याची दोन उदाहरणे. सुशांतसिंह राजपूतच्या जाण्याने त्याचा लाडका कुत्रा ‘फज’ याला प्रचंड धक्का बसलाय. सुशांतच्या प्रिय फजने मालक गेल्याच्या दुःखाने खाणे-पिणेच सोडले आणि त्यानेही दुःखाने मृत्यूस कवटाळले ही बातमी प्रसिद्धी माध्यमे आणि सोशल माध्यमांत पसरली. नंतर ‘फज’ जिंवत असून असे काहीही घडले नसल्याचा खुलासा झाला. सुशांतच्या आत्महत्येनंतर पाचव्या सहाव्या दिवशी राखी सावंत या अभिनेत्रीने आणखी एक विनोद केला. तिने स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करून सांगितले, काल रात्री सुशांत तिच्या स्वप्नात आला. सुशांतने तिला झोपेतून जागे केले आणि सांगितले, ‘बाई तू लग्न कर, मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे !'”

उत्सवी आत्महत्या

संजय राऊत यांनी सुशांतच्या आत्महत्येला दिलेल्या महत्त्वावरुनही टीका केली. ते म्हणाले, सुशांतची आत्महत्या हे उत्सवाचे एक निमित्त आहे. त्याच्या बायकांशी असलेल्या अनेक भानगडी (ब्रेकअप) हाच उत्सवी गुऱ्हाळाचा बिंदू आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे किमान 10 अभिनेत्रींशी संबंध उघड”

संजय राऊत म्हणाले, सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचे कोणत्या अभिनेत्रीशी कसे संबंध होते ते प्रसिद्ध झाले. किमान दहा अभिनेत्रींचे संबंध उघड झाले आणि त्यातील काही अभिनेत्रींना पोलिसांनी सतत चौकशीसाठी बोलावले. याची गरज नव्हती. 34 वर्षांचा एक अभिनेता वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर संबंध ठेवतो. त्यातील अनेक मुलींशी त्याचे ब्रेकअप झाले होते आणि पुढे हा सुशांत वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करतो. त्याच्याकडे वैभव होते, कीर्ती होती. जगण्याचे साधन होते, पण त्याच्या गाडीला ब्रेक नव्हता.

सुशांत हा अभिनेता होता आणि निराशेच्या गर्तेत इतरजण मरण पत्करतात तसे त्याने पत्करले. त्याचे काही निर्मात्यांशी आणि बड्या कलावंतांशी संबंध बिघडलेले असतील, पण आज त्याच क्षेत्रात आयुषमान खुरानापासुन नवाजुद्दीन सिद्दिकीपर्यंत असंख्य कलाकार पाय रोवून उभे आहेत. आपले बाप बडे कलाकार आहेत म्हणून अनेक स्टारपुत्र पडद्यावर चालले नाहीत. शाहरुख खान, सलमान खानचे सिनेमेही कोसळत आहेत. नव्या कलाकारांचे सिनेमे चालत आहेत. त्यात सुशांत राजपूतही होताच, असं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.