मुंबई : कोविड १९ मुळे झालेल्या मृत्यूंमध्ये मार्च महिन्यात मोठी घट झाली आहे. राज्यात मार्चमध्ये कोविड मृत्यूची संख्या फेब्रुवारीमध्ये नोंदवलेल्या ७३७ मृत्यूंच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यांनी घटली. याच तुलनेत जानेवारी महिन्यात जेव्हा कोविडची लाट शिखरावर होती तेव्हा ९५ टक्के मृत्यू नोंदले गेले होते. त्यावेळेस १,५२४ कोविड मृत्यू नोंदले गेले.
राज्यात पहिल्यांदाच कमी कोविड मृत्यूंची नोंद केली गेली. मार्चमध्ये आतापर्यंत एकूण ७३ कोविड मृत्यू नोंदले गेले आहेत; तर डिसेंबर २०२१ मध्ये २६२ कोविड मृत्यू नोंदले गेले होते, जेव्हा कोरोनाची दुसरी लाट कमी होत होती. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, कोविड महामारी सुरू झाल्यापासून मार्च महिन्यात सर्वात कमी कोविड मृत्यू नोंदले गेले आहेत; तर राज्यातील अनेक जिल्हे आहेत जिथे मार्चमध्ये शून्य मृत्यूची नोंद आहे. गेल्या २० दिवसांपासून राज्यात एक अंकी मृत्यू नोंद होत आहेत. तसेच गेल्या सहा दिवसांत राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
शुक्रवारी मुंबईतील मृत्यूंची पुनर्नोंदणी केली गेली. ज्यात मुंबईचे एकूण मृत्यू इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाढलेले दिसतात. त्यात १६ हजार ६९३ वरून १९,५५८ एवढे मृत्यू झाले असून यात २ हजार ८६५ नव्या मृतांची भर पडली आहे. कोविड १९ च्या मृतांमध्ये इतर कारणांनी झालेल्या मृतांचाही समावेश केला गेला होता. राज्यात दुसऱ्या लाटेच्या शिखरावेळी एप्रिलमध्ये २९,५५१, मे मध्ये २८,६६४ कोविड मृत्यू नोंदले गेले.
नॉन कोविड रुग्णांसाठी चांगली बाब
कोविडमधून सुधारलेल्या परिस्थितीवरून नायर रुग्णालयाचे आयसीयूचे विभागाचे प्रमुख डॉ. राकेश भदाडे यांनी सांगितले की, एकेकाळी रुग्णालय समर्पित कोविड रुग्णालय होते. पण आता गंभीर कोविड-१९ आजाराने दाखल होणारा एक ही रुग्ण नाही, यासह एकाही रुग्णाला ऑक्सिजन सपोर्ट, व्हेंटिलेटरची गरज या महिन्यात लागली नाही. ही नॉन कोविड रुग्णांसाठी एक चांगली बाब आहे.
''पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत भयानक परिस्थिती होती. आता लसीकरणात चढ-उतार होत आहे; पण नवा व्हेरिएंट आला नसल्याकारणाने सद्यस्थितीत कोणताही धोका नाही; परंतु काळजी घेतलीच पाहिजे. मास्क घातले पाहिजे. जिनोम सिक्वेसिंग करणे गरजेचे आहे. कारण त्यातून भविष्यातील व्हायरसचा धोका टाळता येईल.''
- डॉ. राहुल पंडित, सदस्य, कोविड टास्क फोर्स.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.