डोंबिवली - पावसामुळे कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे. या खड्यांनी वाहनचालक त्रस्त असतानाच पालिका अधिकारी मात्र केवळ या खड्ड्यांची पाहणी करून स्वतःची प्रसिद्धी करून घेताना दिसत आहे.
कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकू,खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार अशा घोषणा शहर अभियंता करत आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी काही होताना दिसत नाही.
गुरुवारी रात्री द्वारली येथे दुचाकीस्वाराचा खड्डा चुकवत असताना डंपर खाली सापडून जीव गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी पहिले शहरअभियंता अहिरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांची खड्डयांनी दूरवस्था झाली आहे. यात शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यांचा समावेश आहे. यातीलच एक असलेला कल्याण मलंगरस्तावर दरवर्षी खड्डे पडून अपघात होत आहेत.
रस्त्यांच्या दुरावस्थे विषयी वृत्त प्रसारित झाल्यानंतर पालिका अधिकारी जागे होऊन शहरात पहाणी दौरा करत केवळ घोषणा करताना दिसत आहे. जुलै महिन्यात 10 जुलै च्या आसपास शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी इतर अभियंता सोबत दुचाकीवर खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यानंतर रस्त्यावरील खड्डे त्वरित भरण्यात यावेत.
जे कंत्राटदार योग्य काम करणार नाही त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल अशी घोषणा केली होती. यानंतर 10 च दिवसांत पुन्हा शहर अभियंता अहिरे यांच्यावर खड्ड्यांची पाहणी करण्याची वेळ आली. गुरुवार (20 जुलै) त्यांनी ही पाहणी करत खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरण्यात येईल अशी नवी घोषणा केली.
ही घोषणा होऊन काही तास उलटत नाही तोच रात्री 11.30 च्या दरम्यान कल्याण मलंग रोडवर द्वारली येथे एका दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डे चुकवताना त्याचा तोल गेला आणि एका डपंरच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
खड्ड्यांमुळे हा अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी पोलीस पाटील चेतन पाटील यांनी केला आहे. सूरज गवारी असे मयत व्यक्तीचे नाव असून तो कल्याण पूर्व चिंचपाडा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
खड्डयांनी एका व्यक्तीचा जीव गेल्यानंतर आता तरी पालिका अधिकारी हे गांभीर्याने घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. की केवळ रस्ते पाहणी करून प्रसिद्धी करून घेण्यातच पालिका प्रशासन अधिकारी खुश राहतात हे पहावे लागेल.शहर अभियंता अहिरे यांच्यावर पहिले कारवाई करा.
मनसे शहर अध्यक्ष - मनोज घरत
दरवर्षी केडीएमसी हद्दीतील रस्त्यांची खड्डे पडून दुरवस्था होत असते. या खड्ड्यांमुळे वाहनचालक कधी गंभीर जखमी होतात तर काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. परंतु प्रशासनाला याच काही सोयरे सुतक पडलेले नाही.
प्रशासनातील शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी काही दिवसांपूर्वी खड्डे पाहणी करण्यासाठी बाईकवर फिरले. पण त्यांना हे कळत नाहीये नुसतं बाईकवर फिरून काम होत नाही, तर कंत्राटदारांकडून काम करून घ्यावे लागत. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहेत हेच भ्रष्टाचार करतात.
म्हणूनच या कामाची गुणवत्ता राखली जात नाही व अपघात होतात. अहिरे असे म्हणतात की एखादा अपघात झाल्यास त्यासाठी संबंधित अभियंता, कंत्राटदार यांच्यावर कारवाई केली जाईल. मनसेचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हात झटकू नका. सगळ्यात पहिली कारवाई जर कोणावर व्हायची असेल तर शहर अभियंता अहिरे यांच्यावर करावी अशी आमची आयुक्तांना विनंती आहे.
प्रत्येक वर्षी मे पर्यंत रस्त्याची दुरुस्ती चाललेली असते. जून उघडताच या रस्त्याची खड्डे पडून दुरावस्था होते. हा रस्ता बघितला तर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता तेच आम्हाला समजत नाही. त्या खराब रस्त्यांमुळे रिक्षा चालकांना अनेक त्रास सहन करावा लागत आहे. केडीएमसी प्रशासन काम करते पण ते मलमपट्टी केल्यासारखं करते. जून जुलै महिन्यात लगेच रस्त्यावर खड्डे पडतात. या रस्त्याची कायमस्वरूपी नीट व्यवस्था करावी.
- श्रीधर गायकर, रिक्षाचालक
कल्याण मलंग रोड हा मुख्यरस्ता असून कल्याण हुन तळोजा, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रवासी आणि नागरिक या रस्त्याचा वापर करतात. तसेच केडीएमटी बसेस सुद्धा कल्याण हुन तळोजा, नवी मुंबई याचं रस्त्यावरून जातात.
या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुकवताना अनेकदा या रोडवर अपघात होत असतात. हे खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी केली जातेय, मात्र कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून तात्पुरती डागडुजी केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.