पुन्हा लॉकडाऊनबाबत अफवांचे पीक! समाज माध्यमांवरील चर्चांमुळे व्यापारी संभ्रमात

पुन्हा लॉकडाऊनबाबत अफवांचे पीक! समाज माध्यमांवरील चर्चांमुळे व्यापारी संभ्रमात
Updated on

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्यामध्ये सध्यातरी लॉकडाऊन शक्‍य नाही, असे विधान केले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आणि दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता लॉकडाऊनबाबत समाजमाध्यमांवर झडणाऱ्या चर्चा, अफवांमुळे सर्वसामान्य, व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाऊनमुळे आधीच मोठा आर्थिक फटका बसला असताना अद्यापही आर्थिक घडी सुरळीत झाली नाही. त्यातच पुन्हा लॉकडाऊन झाल्यास करायचे काय, असा प्रश्‍न व्यापाऱ्यांना सतावत आहे. 

कल्याण-डोंबिवलीतही 100च्या खाली गेलेला कोरोना रुग्णांचा आकडा सध्या 100 च्या वर जात आहे. हीच स्थिती ठाण्यातही आहे. दिल्ली आणि अहमदाबाद येथे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर मुंबई व उपनगरातही लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगत आहे. गेले आठ महिने देशासह राज्यात लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आणि गोरगरिबांना मोठा आर्थिक फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प पडले. आता हळूहळू निर्बंध हटवले जात असताना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊन पुन्हा लागू होणार, अशी अफवा सातत्याने उठत असल्याने त्याची चिंता व्यापाऱ्यांना भेडसावत आहे. 

पुन्हा सावरण्यास वर्ष लागेल 
मुंबईत व्यापाऱ्यांना लवकर दुकाने बंद करण्यास सांगितले जात असल्याची चर्चा कानावर आली आहे. मुंबईत लॉकडाऊन जाहीर केल्यास ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही तो लागू होईल. गेले आठ महिने दुकान बंद होते. दिवाळी सणातही चांगला व्यवसाय झालेला नाही. आता लग्नसराईचे दिवस आहेत, फार नाही परंतु काही प्रमाणात व्यवसाय होत असून तोही पुन्हा बंद झाल्यास आम्ही काय करायचे. या सर्व आर्थिक संकटातून सावरण्यास आम्हाला किमान वर्षभराचा कालावधी लागेल, असे डोंबिवलीतील कपडा व्यापारी नीलेश जगताप यांनी सांगितले. 

पुन्हा तेच पुढ्यात येणार का? 
कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय हे चिंताजनक असले तरी आता पुन्हा लॉकडाऊन झाल्यास घर चालविणेच मुश्‍किल होईल. वीजबिल, दुकानाचे भाडे या सर्व गोष्टींनी आर्थिक बाजू पूर्ण कमकुवत झाली असून व्यवसाय बंद झाल्यास खायचे काय, हा मोठा प्रश्‍न आहे. आठ महिने कसेबसे काढले, आता पुन्हा तेच पुढ्यात येणार का, या चिंतेत झोपही लागत नाही, असे गिरण चालवणाऱ्या विमल चव्हाण म्हणाल्या. 

नियम कडक करा, पण लॉकडाऊन नको 
आमच्या दुकानात कपडे तसेच पडून आहेत. किमान काही तरी पैसा आमच्या हाती येईल, या उद्देशाने शिवलेले कपडे अत्यंत कमी दरात आम्हाला विकावे लागतात. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास आहे तो माल पूर्णपणे खराब होण्याची शक्‍यता असून आधीच डोक्‍यावर दुकानाचे कर्ज, त्यात आर्थिक नुकसान यातून पुन्हा उभारी घेता येईल का, याचाच विचार करते. कडक नियमांची अंमलबजावणी योग्य आहे, परंतु पुन्हा लॉकडाऊन नकोच, असे शिवणकाम करणाऱ्या रागिणी जयतापकर म्हणाल्या. 


rumors about lockdown again Traders confused due to discussions on social media

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.