खारजमिनीला खाऱ्या पाण्यापासून मुक्ती कधी?

बोर्लीपंचतन : समुद्राच्या भरतीचे पाणी खारजमिनीत शिरत असल्यामुळे शेतकऱ्यांनी खारीशेती पिकवायची सोडून दिली आहे.
बोर्लीपंचतन : समुद्राच्या भरतीचे पाणी खारजमिनीत शिरत असल्यामुळे शेतकऱ्यांनी खारीशेती पिकवायची सोडून दिली आहे.
Updated on

बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्‍यातील वडवली, दिवेआगर, बोर्लीपंचतन परिसरातील खारजमिनी अनेक वर्षांपासून अशाच पडून आहेत. कारण या जमिनीत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरत असल्यामुळे मालकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मेहनत करूनही खारजमीन पिकत नसल्याने शेतकऱ्यांनी खारीशेती पिकवायच्या सोडून दिल्या आहेत. अतिउत्साही खवय्ये मासे पकडण्यासाठी उघडीचे दरवाजे तोडत असल्याने भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणात खारशेतीमध्ये शिरत असल्याचे येथील नागरिकांचा आरोप आहे.

वडवली, दिवेआगर, बोर्लीपंचतन येथील जमिनीवर पीक घेत नसल्याने वेगवेगळ्या प्रकारचे गवत, ल्हवी उगवत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना मालकी जमीनही ओळखायला येत नाहीत. तरीदेखील काही शेतकरी पीक घेण्यासाठी मेहनत करतात; पण अतिउत्साही मच्छी शौकीन उघडीचे दरवाजे तोडून टाकत असल्याने समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात खारशेतीमध्ये शिरते. त्यामुळे त्यांना अतोनात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. समुद्रातून येणाऱ्या खाऱ्या पाण्यामुळे नागरिक अक्षरशः मेटाकुटीस आल्याने शेवटी खारीशेती पिकवायच्या सोडून दिल्या आहेत.

सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारची घोषणाबाजी सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीरपणे दखल घेऊन सरकारकडे पाठपुरावा करण्याची आवश्‍यकता आहे. याशिवाय, नष्ट होत असलेली जमीन पिकण्यायोग्य होण्यास योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, ज्या ठिकाणी खाडी आहे तेथे बंधारे बांधण्यात यावेत, अशा मागण्या खारजमीन मालक करत आहेत. सुवर्ण गणेशाच्या दर्शनासाठी जातो त्या बांधापासून ते वडवली वेळासपर्यंत खारजमिनी विस्तारल्या आहेत. तेथील सर्वच भागांत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींची प्रशासन योग्य ती दखल घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील की, फक्‍त घोषणाबाजी करून विकासकामे केली आहेत हे मतदारांना दाखवतील, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. 

आज शेतकरी जगला तर नागरिकांना जेवायला अन्न मिळेल; पण जर का बळिराजाची दशा कराल, तर मात्र भविष्यात माती खायला लागेल. त्यामुळे प्रशासनाने निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही नजर टाकावी. त्यांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घ्या, आश्वासनांचा खैरात नको. अंमलबजावणी व्हायला हवी, तरच शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी होईल, अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत.

आम्हाला कर्जमुक्तीची गरज नाही. आम्ही कष्ट करून शेती करू; पण जे उघडीचे दरवाजे तुटून जातात त्याची दुरुस्ती करावी. पावसाळ्यात खाडी पार करून लावणीसाठी यावे लागते. त्यावर छोटे पूल बांधले, तरी खूप मोठी मदत होईल. सात उघडीचे दरवाजे आहेत. त्या बाजूने तर भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर आत येत असते.
- संतोष पेरवे, शेतकरी

सात उघडीवर जे लाकडी दरवाजे बसवले आहेत, तिथे भरतीच्या पाण्याने मासळी मोठ्या प्रमाणात आत यावी म्हणून मच्छीमार मोठमोठे दगड लावून दरवाजे कायम उघडे ठेवतात. त्यामुळे भरतीचे पाणी खाडीत येऊन ते खारजमिनीत शिरते. त्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने खारेपाणी जमिनीत साठून राहते. नागरिकांच्या तक्रारीमुळे मच्छीमारांना अटकाव करावे, अशी आम्ही जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनाही लक्षात आणून दिले होते. हा प्रकार मच्छीमारांमुळेच होतो. त्यावर कायमचे बंधन आणणे महत्त्वाचे आहे.
- एस. टी. लहाने, कनिष्ठ अभियंता, 
खारभूमी सर्वेक्षण अन्वेषण उपविभाग श्रीवर्धन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.