सामनाच्या अग्रलेखात विखे पाटलांचा असा घेतला समाचार

सामनाच्या अग्रलेखात विखे पाटलांचा असा घेतला समाचार
Updated on


मुंबई- शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा समाचार घेण्यात आला आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता, आता महाराष्ट्राचे ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. ‘विखे पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला अन पडला. काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे, वैफल्य, दुसरे काय अशा शब्दात शिवसेनेनं भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्यावर सडकून टीका केलीय. 

सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडफडणार्‍या माशांप्रमाणे काही मंडळींची तडफड होते. सध्या भाजपमध्ये असलेले राधाकृष्ण विखे-पाटील हे त्याच तडफडणार्‍या माशांचे प्रतिनिधी आहेत. झक मारली आणि भाजपमध्ये गेलो या चिडीतून ते टाळूवरचे केस उपटत असतील. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे, अशी घणाघाती टीका विखे पाटलांवर केली आहे.

आजच्या सामनाच्या अग्रलेखात काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण पाटील यांच्यावर जोरदार प्रहार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावर विखे पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली होती.

काय म्हणाले होते विखे पाटील

मी काँग्रेस पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना पद मिळालं. या बाळासाहेब थोरातांचं स्वतःचं कर्तृत्व काय? गांधी-नेहरुंचे विचार सोडून ते मातोश्रीचे उंबरठे झिजवत आहेत. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी पुढाकार घेतला असता, तर आनंद वाटला असता. मात्र केवळ सत्तेत वाटा मिळवण्यासाठी लाचारी केली जात आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु आहे, अशी घणाघाती टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती.

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात 

जगभरातील विनोदी साहित्यात विसराळूपणा हे विनोदाचे अंग बनले आहे. मराठी रंगमंच आणि पडद्यावरही ‘विसराळू’ पात्र खास आणून विनोद निर्माण केला जातो. अशा विसराळू पात्रांत आता नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे-पाटलांची भर पडली आहे. विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहोत याचे प्रयोग विखे स्वतः अधूनमधून करत असतात. विखे महाशयांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविषयी असे महान भाष्य केले, की “एवढे वर्ष काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत”. यावर शांत बसतील ते थोरात कसले. थोरातांनीही सांगितले की “मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे” यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नयेत, हा साधा नियम विखे विसरले असतील, तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेले बरे. 

लाचारी आणि बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते, असा बोचरा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

विखे अनेक वर्षे काँगेस पक्षात होते हा आता इतिहास झाला. वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे आणि आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत आणि निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. 

विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात. विखेंचे आजचे वैभव आणि साम्राज्य ही काँग्रेसची देणगी आहे. नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या खाटेवर ते आणि त्यांचे घराणेच आतापर्यंत पाय लांब करून बसले होते, पण एक दिवस विखे सहकुटुंब शिवसेनेत आले. राज्यात आणि केंद्रात मंत्रिपदे भोगली आणि नंतर पुन्हा काँग्रेस पक्षात जाऊन सत्ताधारी झाले. काँग्रेसकडून सत्तापद भोगले आणि २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ते फडणवीसवासी झाले. सध्याच्या कुटील राजकारणात यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नाही. पण स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून या विकृतीने तरी कळस गाठू नये.

संकटकाळात सगळ्यात जास्त काम हे विरोधी पक्षालाच असते. राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्‍यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे त्या प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले' अशी टीका विखे पाटील आणि नारायण राणे यांच्यावरही करण्यात आली.

मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्‍यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे त्या प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले. विखे-पाटील हे तर विरोधी पक्षनेते असतानाच भाजपमध्ये विलीन झाले. अशी हिंमत (लाचारी नव्हे!) अंगात भिनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. थोरात वगैरे मंडळींचे कष्ट त्या दिशेने तोकडे पडले इतकेच म्हणावे लागेल.

विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते तर आज ते सरकारात काँग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली. कोलांटउडीचे डोंबारी राजकारण प्रत्येकवेळी चालतेच असे नाही. विखे-पाटील यांनी भाजपवर काय काय मळीच्या गुळण्या टाकल्या आहेत हे त्यांनीच एकदा आठवून पाहावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.