पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात ३०, तर आसाममध्ये ३९ जागांसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "बंगालमध्ये भाजप विरूद्ध ममतादीदी हा निवडणुकीचा मोठा संघर्ष आहे. पण मला विश्वास आहे की ममतदीदी ही निवडणूक नक्की जिंकतील", असं ते म्हणाले. "ममतादीदींनी देशातील विरोधी पक्षांना पत्र लिहून एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. जे पी नड्डा हे भाजपचे मोठे नेते आहेत. ममतादीदींच्या पत्रावरून त्या हतबल झाल्या आहेत असं समजण्याची चूक त्यांनी करू नये. देशाची लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्षही ताकदीचा असायला हवा. जेव्हा देशात काँग्रेसची सत्ता होती तेव्हा NDAच्या माध्यमातून आम्ही विरोधीपक्ष म्हणून काम केले होते. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी विरोधकांना एकत्रित आणणं गरजेचं आहे. त्यामुळे जे पी नड्डा यांनी विरोधकांना कमी लेखू नये", असा इशारा राऊत यांनी दिला.
"ममतादीदींनी देशातील विरोधी पक्षांना पत्र लिहून एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांसारख्या बड्या नेत्यांना हे पत्र मिळाले आहे. लोकशाहीवर अनेकदा आघात झाले आहेत. या आघातांविरोधात कायमच देशातील विरोधी पक्ष लढले आहेत, म्हणूनच देशात अद्याप लोकशाही टिकून आहे. ममतादीदींनी पुढाकार घेतला आहे. यावर सर्व विरोधकांनी विचार केला पाहिजे", असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात आज ३० जागांसाठी मतदान होत आहे. बंगालमध्ये मतदान सुरू झाल्यानंतरही तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील संघर्ष दिसला. तृणमूलच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली, तर तृणमूलकडून आपल्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप भाजपाने केला. सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मतदारांनी अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या. सकाळी पहिल्या दोन तासांत बंगालमध्ये अंदाजे १३ टक्के मतदान झालं. पश्चिम बंगालमध्ये मतदानाला सुरूवात झाल्यानंतरही तणाव दिसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.