मुंबई - महाराष्ट्राचा `वाघ` गेले आठ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय, मुखपत्रातून आग ओकतोय, त्यालाही घरच्यांनी मरतुकडा म्हणावे हे जरा अतीच नाही का, अशा शब्दांत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.
दिल्लीत सुरु असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे पेटत नसल्याची खंत राऊत कार्यकारी संपादक असलेल्या दै. सामनामधून व्यक्त झाली आहे. त्याचा भातखळकर यांनी ट्वीट तसेच समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसारित करून समाचार घेतला आहे. सध्या दिल्लीत शिवसेनाही विरोधी पक्षात असल्याने एकप्रकारे राऊत यांनी स्वपक्षाला व त्याच्या नेत्यांनाही मरतुकडे म्हटल्याचे भातखळकर यांनी दाखवून दिले आहे व राऊत यांची टर उडवली आहे.
या अग्रलेखाद्वारे विरोधी पक्षांना मरतुकडे म्हणत त्यांच्यावर टीका करणाऱ्या राऊत यांनी काँग्रेसवर तर टीका केलीच आहे, पण घरबसल्या मोदींवर रोज टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर पण टीका केली आहे. महाराष्ट्राचा `वाघ` गेले आठ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय, मुखपत्रातून आग ओकतोय, त्यालाही घरच्यांनी मरतुकडा म्हणावे हे जरा अतीच नाही का, असे ट्वीट करत भातखळकरांनी राऊत यांना टोला लगावला आहे.
पण या तोंडपाटिलकीचा काहीही उपयोग होणार नाही. नरेंद्र मोदींविरुद्ध सगळे विरोधक एकत्र आले तरी काहीही फरक पडत नाही हे अनेकदा दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीत तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीतही हीच बाब दिसून आली आहे. तरीही मोदीद्वेषाची उबळ दाखवण्यापेक्षा मोदींसारखे भ्रष्टाचारमुक्त व कार्यक्षम प्रशासन द्या. गरीबांच्या हिताचे निर्णय नुसते करण्यापेक्षा ते अमलात आणा तरच जनता तुमच्याबरोबर उभी राहील, असा टोमणाही भातखळकर यांनी एका व्हिडियोद्वारे मारला आहे.
ख्रिसमसच्या शुभेच्छा देणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांना अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्याचा विसर पडला. हा विसर जाणीवपूर्वक होता की चुकून हा प्रश्न आहे. तुम्ही भाजपचा द्वेष करता पण अटलबिहारींसारख्या अजातशत्रू आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाला आदरांजली व्यक्त करण्याबाबतही राजकारण करता हे पाहून महाराष्ट्राची मान शरमेने खाली जात आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.
Sanjay Rauts mockery by Bhatkhalkar
--------------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.