मुंबई- बदलापूरमध्ये मंगळवारी पालकांचा उद्रेक पाहायला मिळाला. एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये रेलरोको केला होता. पालक जवळपास १० तास रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडून होते. त्याचीच खबरदारी म्हणून आज देखील पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्टेशनबाहेर मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
सकाळपासूनच पोलीस बदलापूर स्टेशनच्या बाहेर तैनात आहेत. मात्र, रेल्वेसेवा सध्या सुरळीत सुरु आहे. केवळ खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. यादिवशी आज देखील बदलापूरमध्ये इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बदलापूरमध्ये कलम १६३ लागू करण्यात आला आहे.