विरार : आगरी भाषा बोलली जावी, लिहिली जावी आणि टिकावी यासाठी आगरी ग्रंथालय चळवळ आयोजित सरावनसरी (श्रावणसरी) हे आगरी साहित्य संमेलन काल वसईमधील तुंगारेश्वर डोंगरावरील सदानंद महाराज आश्रमात पार पडले. या साहित्य संमेलनाचे हे दुसरे वर्ष होते. संजीवन म्हात्रे यांनी या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुशांत पाटील होते.
आगरी भाषेतील विविध साहित्यप्रकार या संमेलनात सादर झाले. ग्रंथदिंडीने या कार्यक्रमाची सुरूवात झाली. आगरी साहित्य आणि अध्यात्म या विषयावर आधारित चर्चा सत्राला मोठा प्रतिसाद मिळाला. गजानन म्हात्रे, सुनिल पाटील, मयुरेश कोटकर आणि डॉ. शोभा पाटिल यांनी या चर्चासत्रात आगरी समाज आणि अध्यात्म कसे एकरूप झाले आहेत यावर प्रकाश टाकला. या चर्चासत्रानंतर 'गीतकार स्व.अनंत पाटिल कट्टा' हा कार्यक्रम सादर झाला. गीतकार अनंत पाटिल यांचे आगरी गीतपरंपरेमध्ये खूप मोठे योगदान आहे.
त्यांना आदरांजली वाहण्यासाठी या साहित्य संमेलनात त्यांनी लिहिलेली अनेक अजरामर गीते सादर केली गेली. प्रसिद्ध गायक जगदीश पाटील आणि संतोष पाटील (दादूस) यांनी ही गीते सादर केली. धवलागीत आणि डाकीगीत ही आगरीभाषेतील विशेष लोकगीतांचे सादरीकरणही या कार्यक्रमात झाले. तसेच सदानंद महाराज लिखित नाटिकांचे सादरीकरण या संमेलनात झाले. ह.भ.प. मदन बुवा नाईक, ह.भ.प. विनित महाराज म्हात्रे, ह.भ.प जयेश महाराज म्हात्रे या आगरी कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम या संमेलनाचे आकर्षण ठरले. आगरी साहित्यातील एकमेव 'ब-बोलीचा' या नियतकालिकाच्या दुसर्या अंकाचे प्रकाशन या साहित्य संमेलनात करण्यात आले. या दुसर्या आगरी साहित्य संमेलनाची सांगता आगरी समाजातील विशेष लोकप्रिय असणाऱ्या पारंपरिक फेऱ्यांची गाणी आणि बाळ्यानृत्याने झाली. मोठ्या संख्येने आगरी बांधव या साहित्य संमेलनाला उपस्थित होते. आगरी गीतांवर ठेका धरून आगरी बांधवांनी या साहित्य संमेलनाला दाद दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश भोईर, सर्वेश तर्रे आणि निर्मला पाटील यांनी केले.
"आगरी भाषा बोलली जावी, लिहिली जावी आणि टिकावी या हेतूने आगरी ग्रंथालय चळवळी अंतर्गत हे साहित्य संमेलन आम्ही आयोजित केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक आगरी ग्रंथालय असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आगरी ग्रंथालय चळवळ सुरू झाली. या चळवळी अंतर्गत अनेक उपक्रम आम्ही केले त्यातीलच उपक्रम म्हणजे हे सरावनसरी म्हणजेच श्रावणसरी हे आगरी साहित्य संमेलन.
गेल्या वर्षी पहिल्यांदा हे साहित्य संमेलन भिवंडी येथे आयोजित करण्यात आले होते. शाहीर शनिकुमार यांच्या रचनांवर आधारित सादरीकरण पहिल्या साहित्य संमेलनात झाले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर या दुसर्या आगरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे." असे मत आगरी ग्रंथालय चळवळीचे सदस्य सर्वेश तर्रे यांनी मांडले.
या संमेलनाच्या निमित्ताने शहा नामक एका भक्ताने स्वतः बनवलेला बालयोगि सदानंद महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्या भक्ताच्या हस्ते सदानंद महाराजा समोर करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.