Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या प्रतिमेची सिनेट सदस्यांना चिंता ;सिनेट सभेत सदस्यांची विद्यापीठाच्या प्रतिमेसाठी एकजूट

मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही समाजमाध्यमांवर आरोप केले जात आहेत, काही आरोप परीक्षा, निकाल यासोबतच अनेक विषयांवरील पोस्ट वायरल केल्या जात आहेत.
Mumbai University
Mumbai Universitysakal
Updated on

मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही समाजमाध्यमांवर आरोप केले जात आहेत, काही आरोप परीक्षा, निकाल यासोबतच अनेक विषयांवरील पोस्ट वायरल केल्या जात आहेत. अशा प्रकारे प्रतिमा मलिन करणाऱ्यांना वेळीच चाप लावण्याच्या मागणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सभेत शिक्षक, प्राचार्य, राज्यपाल नियुक्त आदी सदस्यांनी विद्यापीठाची प्रतिमा जपण्यासाठी एकजूट दाखवली. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी विद्यापीठाने गांभिर्याने घ्यावे अशी मागणीही सदस्यांनी लावून धरली.

यावर कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी विद्यापीठाची जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न होत आहेत, अनेकदा खुर्चीची मर्यादा असल्याने संविधानिक पद्धतीनेच उत्तर द्यावे लागते. मात्र यापुढे अशा गोष्टींना आवरण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणे सुरू केले असून यासाठी योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली.

विद्यापीठातील आयडॉलसह इतर विषयांवर समाजमाध्यमांवर काही पोस्ट वायरल होत असून त्यातून स्वैर आरोप केले जात आहेत. यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत असल्याचा मुद्दा सिनेट सदस्य डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी औचित्याच्या माध्यमातून उपस्थित केला होता. अशा आरोपांना आळा घालण्यासाठी विद्यापीठाने कायदेशीर यंत्रणा उभारली आहे का असा सवालही त्यांनी केला. तर डॉ. वसंत माळी यांनी छटाकभर विद्यार्थी संख्या असलेल्या संस्थात कार्यरत असलेले काही व्यक्ती मुंबई विद्यापीठापेक्षा आम्ही लवकर निकाल जाहीर करून पीएचडीचे प्रवेश करतो, असे सांगून गैरसमज पसरवतात, विद्यापीठाची बदनामी करतात, अशांवर विद्यापीठ नियमानुसार कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तर डॉ. वंदना महाजन यांनी मुंबई विद्यापीठाचे कालिना संकुल हे हृदय आहे. मात्र त्यावर कोणी आरोप करत असतील ते योग्य नसल्याचे सांगितले.

दरम्यान सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेत प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर राज्यपालांनी काही गोष्टी नोंदवल्या असल्याची माहिती दिली. विद्यापीठाची बदनामी करण्यासोबत विद्यापीठाच्या कामकाजातही हस्तक्षेप केला जातोय, अधिकाऱ्यांचा अपमान केला जातोय, त्यात समाजमाध्यमांवर जे समोर येते त्यावर प्रतिक्रिया देणे अडचणीचे असते. यामुळे सभागृहातील सदस्यांची एकूणच भावना लक्षात घेता विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन ठोस कारवाई केली जाईल, अशी ग्वाही डॉ. भामरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.