कोरोनामुळे ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन

कोरोनामुळे ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन
Updated on

मुंबई - प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांचं आज निधन झालं. 17 मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मतकरी यांना कोरोना झाला होता असं समजतं आहे.  रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार,  रंगकर्मी  आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अशी रत्नाकर मतकरी यांची सर्वांना ओळख आहे. 

सेवन हिल्स रुग्णालयात सुरु होते उपचार 

गेल्या काही दिवसांपासून त्यांना थोडा थकवा जाणवत होता. म्हणून चार दिवसांपूर्वी त्यांना गोदरेज हॉस्पिटलमध्ये चेकअप साठी दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे त्यांची कोविड 19ची टेस्ट केली. त्यांची ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना पुढच्या उपचारांसाठी सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यांची कोरोनावरील झुंज अपयशी ठरली आणि तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रत्नाकर मतकरी ही 81 वर्षांचे होते.

रत्नाकर मतकरी यांची कारकिर्द

1955 साली वयाच्या 17व्या वर्षी,  त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते.

मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी चांगलीच गाजवली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोहोचवला.

रत्नाकर मतकरी यांचं साहित्य लेखन

मोठ्यांसाठी 70 तर मुलांसाठी 22 नाटकं,  अनेक एकांकिका, 20 कथासंग्रह,  3 कादंबऱ्या,  12 लेख संग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेत. आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’  अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहिरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका,  तसंच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमातील कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.

रत्नाकर मतकरी यांना संगीत नाटक अकादमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहे. या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीमत्वात मतकरी यांचा समावेश होतो. रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. 

रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी,  कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद,  पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डॉ. मिलिंद विनोद,  पल्लवी मतकरी आणि नातवंडे असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.