मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पातील चांगल्या तरतुदींचे सेन्सेक्स व निफ्टी या भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी स्वागत केले. आज सेन्सेक्स १५८.१८ अंश तर निफ्टी ४५.८५ अंश वाढला. अर्थसंकल्पाचा फटका बसलेले विमा आणि बँकिंग क्षेत्राचे शेअर आज घसरले तर आयटी, कॅपिटल गुड्स आणि एफएमसीजी क्षेत्राचे शेअर वाढले.
आज सकाळी व्यवहार सुरु झाल्यापासून सेन्सेक्स साठ हजारांच्या घरातच फिरत होता. अर्थसंकल्पाचे वाचन संपल्यानंतर तो ६०,७७३.४४ पर्यंत गेला होता. पण तेथून नफावसुली सुरू झाली व तो चक्क ५८,८१६.८४ पर्यंत घसरला. मात्र तेथे पुन्हा खालच्या भावात खरेदी सुरू झाल्यामुळे तो सावरला व दिवसअखेर ५९,७०८.०८ अंशावर स्थिरावला. निफ्टी देखील दिवसअखेरीस १७,६१६.३० अंशांवर स्थिरावला. अर्थसंकल्पाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे ६१ हजार व १८ हजारांकडे जात होते. मात्र नफावसुलीमुळे तेथून ते खाली आले.
आज प्रामुख्याने आय टी, एफ एम सी जी व कॅपिटल गुड्स या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले. तर बँका, वित्त संस्था आणि वाहन निर्मिती कंपन्यांच्या शेअरचे भाव खाली गेले. करदात्यांनी नव्या आयकर पद्धतीकडे (न्यू टॅक्स रीजीम) जावे, यावर भर देणारी नवी आयकर रचना अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे करदात्यांची बचत कमी होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बँका आणि अर्थ संस्थांचे तसेच विमा कंपन्यांच्या शेअरचे भाव कोसळले.
त्यातच पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या प्रीमियमवर अत्यंत कमी कर सवलत मिळणार असल्यामुळे देखील विमा क्षेत्राच्या शेअर्सवर परिणाम झाला. खतांवरील अनुदान बावीस टक्के कमी केल्यामुळे चंबळ फर्टीलायझर्स आदी खतनिर्मिती कंपन्यांच्या शेअर्सचे भावही पडले. तर संरक्षण क्षेत्राला फार सवलती न मिळाल्यामुळे संरक्षण सामुग्री निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरचे भावही गडगडले.
सिगरेटवर कर लावल्याच्या बातमीमुळे आयटीसी चा शेअर ३२९ रुपयांपर्यंत घसरला होता. मात्र ही करवाढ पुष्कळच कमी असून ती ग्राहकांवर थोपवता येईल असेही दिसून आल्यामुळे पुन्हा आयटीसी च्या शेअर ने जोरदार उसळी मारली व तो ३६१ रुपयांपर्यंत गेला. या शेअरच्या भावातच अडीच टक्क्याहून जास्त वाढ झाली.
आज टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स सुमारे दोन टक्के वाढले, तर टीसीएस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी यांचे भाव दीड टक्का वाढले. इन्फोसिस, विप्रो, लार्सन अँड टूब्रो, कोटक बँक, टेक महिंद्र, एचसीएल टेक या शेअरचे भावही सुमारे एक टक्का वाढले.
आज बजाज फिन्सर्व्हच्या शेअरचा भाव साडेपाच टक्के कोसळला. स्टेट बँक पाच टक्के, इंडसइंड बँक चार टक्के, सन फार्मा, महिंद्र आणि महिंद्र दोन टक्के कोसळले. ॲक्सिस बँक, मारुती, टायटन, टाटा मोटर, बजाज फायनान्स या शेअरचे भावही एक ते दीड टक्का कोसळले.
अदाणी एंटरप्राईजेसच्या एफपीओ मधील भरणा संपल्यानंतर पुन्हा अदाणी समूहाच्या शेअरचे भाव गडगडले. अदाणी एंटरप्राइजेस २८ टक्के घसरून २,१२८ वर आला. तो त्याच्या एफपीओच्या भावापेक्षा एक हजार रुपये कमी किमतीत मिळत आहे. अदानी पोर्ट २० टक्के घसरला, अदानी टोटल गॅस देखील दहा टक्क्यांनी पडला. अदाणी पॉवर, अदानी विल्मर आणि ग्रीन एनर्जी हे शेअर पाच टक्के घसरले तर अदानी ट्रान्समिशन दोन टक्के घसरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.