Loksabha Election : शिंदे-ठाकरे यांच्या शिलेदारांत मुंबईत घमासान!

शिवसेनेचा जन्म झाला त्या शिवसेनेच्या होम पिचवर लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मुंबई व ठाणे जिल्ह्यातील पाच लोकसभा मतदारसंघात (दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण) थेट ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेत लढती होत आहेत.
Loksabha Election
Loksabha Electionsakal
Updated on

मुंबई :  शिवसेनेचा जन्म झाला त्या शिवसेनेच्या होम पिचवर लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मुंबई व ठाणे जिल्ह्यातील पाच लोकसभा मतदारसंघात (दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण)  थेट ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेत लढती होत आहेत. त्यामुळे या टप्प्यात मुंबईत राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे.

मुंबई दक्षिण लोकसभा हा महत्वाचा मतदारसंघ आहे. ब्रिटीशकालीन मुंबईतील प्रसिद्ध ‘गेटवे ऑफ इंडिया,’ हॉटेल ताजमहल, मंत्रालय, उच्चभ्रूंचा मलबार हिल आदी ऐतिहासिक व महत्वाचा परिसर या मतदार संघात येतो. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबईत १९८४ ते २०१४ पर्यंत काही अपवाद वगळता काँग्रेसचेच प्राबल्य होते. मात्र २०१४ पासून शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी या मतदार संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर अरविंद सावंत यांना शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यामार्फत आव्हान मिळाले. जाधव या भायखळ्याच्या आमदार आहेत. मराठी गुजराती वादाबरोबरच या मतदासंघात भाजपची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

दक्षिण मध्य मुंबईमध्ये या लोकसभा मतदारसंघात  २०१४ पासून आपले प्राबल्य ठेवलेले शिवसेनेचे राहुल शेवाळे व ठाकरे गटाचे विश्वासू अनिल देसाई यांच्यामध्ये लढाई होणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यामुळे शेवाळे यांच्यापासून ठाकरे गटाचा मोठा मतदार दुरावण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे असलेले धारावी, सायन कोळीवाडा, माहीम या मतदारसंघातील मूळ शिवसैनिक दुरावले आहेत.

बहुसंख्य ठिकाणी शिवसेनेच्या शाखांमध्ये शेवाळे आणि त्यांची टीम दुरावली असल्याने शेवाळे यांना त्याचा फटका बसू शकतो. यात मुख्यत्वे चेंबूर आणि धारावी यांचा समावेश होतो. या मतदारसंघात अणुशक्तीनगर आणि चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ येतात. तर मुंबई शहर जिल्ह्यातले धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी राजकीयदृष्ट्या धारावी महत्त्वाची आहे. कारण धारावीची लोकसंख्या लाखोंच्या घरात असून मोठ्या संख्येने अल्पसंख्याक लोक राहत असल्याने राजकीय पक्षांसाठी ती एकगठ्ठा ‘वोटबँक’ आहे. धारावी पुनर्विकासाच्या मुद्दा त्या सर्वांनाच जोडणारा आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावर सिनेतारकांचे वर्चस्व राहिले आहे. या भागात गोरेगावमध्ये ५२० एकरमध्ये पसरलेली फिल्मसिटी येते. या मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे १८०० एकरचे जंगलही याच मतदारसंघाचा भाग आहे. या मतदारसंघात २०१४ नंतर शिवसेनेचे खा.गजानन कीर्तीकर यांचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र फुटीनंतर कीर्तीकर शिंदेंसोबत गेले.

मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटासोबत कायम राहिले व त्यांनाच त्यांनी उमेदवारीही दिली आहे. तर शिंदे यांनी आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली. यात कीर्तीकरांची अडचण झाली. त्यांना मुलाविरोधात प्रचार करण्याची वेळ आली आहे. वर्सोवा, जोगेश्वरी, गोरेगाव हे मतदारसंघ सोडले तर इतर तीन मतदारसंघात साठ टक्क्यांपेक्षा अधिक उत्तर भारतीय आणि इतर परप्रांतीय मतदार वास्तव्याला आहेत. रवींद्र वायकर हे जोगेश्‍वरी विधानसभेतून विद्यमान आमदार आहेत. त्यांना भाजप व त्यांच्या आमदारांचे सहकार्य असेल. तरे कीर्तिकर यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आणि ऋतुजा लटके यांची साथ ही जमेची बाजू आहे. सोबतच महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही त्यांच्या बाजूला आहेत.

ठाणे, कल्याणमध्येही आव्हान...

ठाणे व कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या व शिंदे यांच्‍या शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने असल्याने या दोन मतदारसंघातील राजकीय लढतीही रंगणार आहेत. ठाण्यामध्ये शिंदे गटाचे नरेश मस्के ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यात लढत आहे. तर कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेच उमेदवार असल्याने शिंदे यांच्यासाठी हा मतदारसंघ स्वतःच्या इज्जतीचा व स्वाभिमानाचा विषय बनला आहे. तर ठाकरे गटानेही वैशाली दरेकर यांना उतरवून श्रीकांत शिंदे यांना पाडण्यासाठी कंबर कसली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.