विरार ः कोल्हापूरला मटणाच्या भावावरून झालेला संघर्ष विरतो न विरतो, तोच आता हा संघर्ष वसईमध्येही पेटण्याची चिन्हे आहेत. मटणाचे भाव ५४० ते ६०० रुपये असून ते आटोक्यात आणण्याची मागणी शिवसेनेने तहसीलदारांकडे निवेदन देऊन केली होती. त्यात त्यांनी भाव आटोक्यात न आणल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा दिला होता. त्यामुळे येथील खाटीक समाजही खवळला असून त्यांनीही शिवसेनेला आपल्या स्टाईलने उत्तर दिल्याने हा संघर्ष वाढणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान मटणाच्या वाढलेल्या दरामुळे वसईकरांवर केवळ रस्सा खाण्याची वेळ आली आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात मटणाचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. ते आटोक्यात आणा; अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने त्याचा बंदोबस्त करू, असा इशारा दिल्याचे समजल्यावर येथील खाटीक समाजाने एकजुटीची हाक देत, येणाऱ्या संकटांना; तसेच खाटीक समाजास धमकी देणाऱ्यांना समाजाच्या स्टाईलमध्ये उत्तर देण्याचे एकमुखाने ठरवले आहे. कोणत्याही संकटाला समाजाची वज्रमूठ ताकदीने, समर्थपणे उत्तर देईल. मटणाचे भाव का वाढले, त्यामागची महत्त्वाची कारणे शोधण्याचा प्रयत्न कधीच कोणी केला नाही.
परप्रांतीयांच्या आक्रमणामुळे बकऱ्यांच्या बाजारपेठेत समाजाला बकरा ६०० रुपये किलोने विकत घ्यावे लागतात. चामड्याचा भावसुद्धा चारशे रुपयांवरून १० रुपयांवर आला आहे, याचा विचार न करता आम्हाला धमकी देणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा खाटीक समाजाने दिला आहे.
तालुक्यातील जवळजवळ दोनशे व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता.१४) तातडीची बैठक बोलावून आपल्या हक्कासाठी आणि मटण दरवाढीसाठी निर्वाणीचा इशारा दिला आहे. या वेळी महाराष्ट्र खाटीक समाजाचे नेते कॅप्टन नीलेश अशोक पेंढारी, सुनील जाधव, हेमंत लाड, मोहम्मद खाटीक, जितेंद्र कोथमिरे, विजय घोलप, हरेश्वर जाधव, ख्वाजा कुरेशी यांनी मार्गदर्शन केले.
वसईमध्ये सरकारच्या आदेशांना केराची टोपली दाखवून मटणविक्रेते अवाजवी दराने मटणाची विक्री करत आहेत; तर काही जण बोकडाऐवजी मेंढ्यांचे मटण विकत आहेत. ग्राहकांची होणारी ही फसवणूक न थांबल्यास आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू.
प्रथमेश राऊत, शिवसेनामटणाचे भाव का वाढले, याची कोणतीही खातरजमा किंवा वस्तुस्थिती न बघता शांत असलेल्या समाजाला धमकावण्याचा प्रयत्न कोण करत असेल, तर त्याच भाषेत त्यांना उत्तर देऊ.
कॅप्टन नीलेश पेंढारी, महाराष्ट्र खाटीक समाजाचे नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.