भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या सिटीस्कॅन मशीन, डायलिसीस व ऑपरेशन थेटरचे उद्घाटन करण्याच्या कारणावरून शिवसेना -भाजप व समाजवादी पक्षाच्या आमदारांमध्ये वाद उफाळून आला आहे. भिवंडी पश्चिम भाजपचे आमदार महेश चौघुले यांनी शिवसेना माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत सिटीस्कॅन मशीनचे उद्घाटन केल्यानंतर नाराज झालेल्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार आबू आझमी यांच्या हस्ते पुन्हा मशिनचे उद्घाटन करत रुग्णालयात जल्लोष केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार आझमी यांच्या नावाची कोनशिला तोडून टाकण्याचा प्रकार केला. त्यामुळे परिसरात तणावाचे निर्माण झाले होते.
भिवंडी शहरातील कचेरी पाडा येथे इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. त्यामुळे रुग्णांकडून नेहमी तक्रार केली जाते. या रुग्णालयात शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे व भाजपा आमदार महेश चौघुले यांच्या प्रयत्नाने रुग्णांसाठी सिटीस्कॅन मशीन, डायलिसीस मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र सदर मशीनचा उद्घाटन कार्यक्रम प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे लांबणीवर पडला होता.
त्यामुळे आमदार शेख यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात उपजिल्हा रुग्णालयाच्या दुर्दशेबाबत निवेदन केले होते. त्यामुळे हे रुग्णालय सुस्थितीत तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे या रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत असलेली यंत्रणा पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न शेख यांनी सुरु केले. यानंतर त्यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या हस्ते उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
ही बातमी वाचा ः अनेक महिन्यांपासून मृतदेह शवागारात; वाचा काय घडले
या कार्यक्रमाची कोणतीही माहिती सेना भाजपच्या नेत्यांना देण्यात न आल्याने शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे आमदार महेश चौघुले तसेच सेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत सिटीस्कॅन मशीनचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी आझमी यांच्या नावाची लावलेली कोनशिला तोडून टाकत घोषणाबाजी केली. ही घटना समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन पुन्हा सदर मशीनचे उद्घाटन केले आहे. या घटनेमुळे भिवंडीत समाजवादी पक्षाविरोधात शिवसेना, भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.