मुंबईः मंगळवारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग यांनाही ईडीने ताब्यात घेऊन चौकशी केली होती. काल प्रताप सरनाईक मुंबई बाहेर होते. ते रात्री मुंबईत हजर झाले. त्यानंतर आज ११ वाजता प्रताप सरनाईक यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार होती. तर विहंग सरनाईक यांना १२ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र आताच समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईबाहेरुन आल्याने प्रताप सरनाईक हे क्वारंटाईन झालेत.
सरनाईक यांनी पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती ईडीला केली आहे. सध्या क्वॉरंटाईन असल्याने चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचं त्यांनी ईडीला कळवल्याची माहिती समोर आली आहे. सरनाईक यांच्या वतीनं त्यांचे मेहुणे ईडीकडे विनंती पत्र सादर करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मी परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सरनाईक आज ईडीसमोर चौकशीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान ईडी अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंबीय संपूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
ईडीनं केलेल्या कारवाईवर सरनाईक यांनी संताप व्यक्त केला आहे. ईडीने धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. तसंच फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी असल्याचंही ते म्हणालेत. एबीपी माझा बोलताना त्यांनी वक्तव्य केलं आहे.
ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्यावर हक्कभंग दाखल केला. अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करायला लावला. त्याच दिवशी उद्या काय होणार याचा प्रताप सरनाईकने विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी असल्याचंही ते म्हणालेत.
तसंच ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक या प्रकरणांवर खूप बोलत असल्याचं विचारत होते, असं प्रताप सरनाईक यांनी बोलताना सांगितलं. इतकंच काय तर ईडीचे अधिकारी माझ्या तसंच मुलांच्या घरी, ऑफिसात गेल्यानंतर मस्त नाश्ता केला. चार पाच वेळा चहा घेतला, जेवण केलं. एखाद्या घरात पाहुणे आल्यानंतर स्वागत कसं करायचं हे सरनाईक कुटुंबाला चांगलं माहिती असून माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं, यथोच्छ पाहुणचार केला, असंही सरनाईक म्हणालेत.
या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. प्रताप सरनाईकचं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही. या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे. मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलेलो नाही. जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना अशा ठामपणे उत्तर देत असतो. भविष्यात असे अजून प्रसंग आले तरी समोर जाण्याची तयारी असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.
Shivsena mla Pratap Saranaik Quarantine he will submit request letter ED
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.