संजय राऊतांवर भाजपच्या केशव उपाध्येंची 'रोखठोक' टीका
मुंबई: राज्यात २०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि तेव्हापासून शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्ष महाराष्ट्रात सुरू झाला. शिवसेना आणि भाजपचे नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे कायम मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडत असतात. त्यावर भाजपकडून उत्तरही दिलं जातं. सामनामधील आपल्या रोखठोक या सदरात रविवारी संजय राऊत यांनी एका विषयावरून परखड मत मांडले. पण त्या मताला भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही तितकंच रोखठोक उत्तर दिलं. (Shivsena MP Sanjay Raut slammed by BJP Keshav Upadhye over Stan swami death Rokhthok article)
संजय राऊत यांनी नुकतेच मृत्यू पावलेले फादर स्टॅन स्वामी यांच्याबद्दल 'फादर स्टॅन स्वामी! एका गलितगात्र म्हाताऱ्याची भीती!' या शीर्षकाचा एक लेख लिहिला. त्या लेखामध्ये त्यांनी लिहिले...
मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव प्रसिद्ध होत असताना मुंबईत फादर स्टॅन स्वामी यांचा तडफडून आणि गुदमरून मृत्यू झाला. स्वामी हे राष्ट्रीय तपास एजन्सीच्या ‘कस्टडी’त बऱ्याच काळापासून होते. त्यांचे वय 84 वर्षे. त्यांना ऐकता, बोलता येत नव्हते. दिसतही नव्हते. त्यांच्या हालचाली व श्वास पूर्ण मंदावला असताना तुरुंगातच त्यांना कोरोनाने ग्रासले. जीवनाच्या अंतिम समयी त्यांना झारखंड येथे जाऊन मित्रांसमवेत वेळ घालवायचा होता. पण स्वामी यांच्यावर दहशतवाद, फुटीरतावाद, राज्य उलथवून लावण्याच्या कटात सहभागी होण्याचा आरोप होता. 84 वर्षांचा एक गलितगात्र राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?
'रोखठोक'मधील त्यांच्या मतांवरून भाजपचे केशव उपाध्ये यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. 'सन्माननीय रोखठोक संजय राऊत, सत्ता टिकवण्यासाठी आपण जरूर केंद्रावर टीका करा, राजकीय मतभेद ठेवा, सत्तेसाठी हिंदुत्व तर सोडलंच आहे, पण किमान वस्तुस्थितीवर आधारित तरी लिहा. आपण कोणाचे समर्थन करीत आहात हे तरी पाहा. राज्य सरकारच्या अपयशाकडे तुम्ही लक्ष वेधत आहात',अशी टोला त्यांनी लगावला.
तसेच, 'फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यु दुर्दैवीच आहे पण ते न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगवास भोगत होते, आदेशात काय म्हटल आपल्या माहितीसाठी- प्रथमदर्शनी स्टॅन स्वामी देशात अराजक निर्माण करून सरकार उलथविण्याच्या प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या उद्देशानुसार काम करीत असल्याने जामीन नाकारला. न्यायालयाने स्वामी यांचा जामीन अर्ज अनेकदा फेटाळून लावला होता. स्वामी यांना NIA ने ताब्यात घेतले होते, पण ते तळोजा न्यायालयीन कोठडीत होते. इथे राज्य सरकार त्याचे नियंत्रण करते. स्वामी यांच्या इच्छेनुसार त्यांना रूग्णालयात दाखल केले होते. मग या मृत्यूला राज्य सरकारला जबाबदार नाही का?', असा थेट सवाल केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.