Shivsena Party Anniversary : मुंबईमध्ये आवाज कुणाचा? दोन्ही शिवसेना आज वर्धापनदिनाला करणार शक्तिप्रदर्शन

पक्षफुटीनंतरचा लोकसभेतला सामना तसा बरोबरीत सुटला. आता उद्या (ता.१९) रोजी होणाऱ्या वर्धापनदिनानिमित्त दोन्ही शिवसेना आपापली ताकद किती ते मतदारांना सांगणार आहेत.
Shivsena Party
Shivsena Partysakal
Updated on

मुंबई - पक्षफुटीनंतरचा लोकसभेतला सामना तसा बरोबरीत सुटला. आता उद्या (ता.१९) रोजी होणाऱ्या वर्धापनदिनानिमित्त दोन्ही शिवसेना आपापली ताकद किती ते मतदारांना सांगणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदिनाचा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे शीव परिसरातल्या षण्मुखानंद सभागृहात आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा कार्यक्रम वरळी डोम येथे होणार आहे.

पक्षफुटीनंतरच्या पहिल्या दसरा मेळाव्यात खोके घेत ‘मातोश्री’ला दगा दिला या ठाकरे गटाच्या प्रचाराला कुणी केली गद्दारी, असा प्रश्न करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले होते. आता फुटीनंतरचे पहिले मतदान लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त आटोपले आहे. त्यातही जवळपास समसमान मते घेत दोन्ही शिवसेना पक्षांनी आपापली बाजू बळकट ठेवली.

महाविकास आघाडीला महाराष्ट्राने कौल दिल्याने त्या बाजूकडे गेलेल्या उद्धव ठाकरेंनी नऊ जागा जिंकल्या तर भाजपसमवेतच्या एकनाथ शिंदेंनी सात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला १६.५२ टक्के मते मिळाली. तर शिंदेंच्या शिवसेनेला १२.९५ टक्के. फरक जवळपास चार टक्क्यांचा असला तरी उद्धव ठाकरे गटाने २१ लोकसभा मतदारसंघात नशीब अजमावले तर शिंदे शिवसेनेने १५.

शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाला त्या १३ मतदारसंघांतील सात जागा ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकल्या तर शिंदे यांच्या शिवसेनेने सहा. मात्र आता ठाकरे गट अल्पसंख्यांकांच्या मतांवर निवडून येत आहे. शिवसेनेचा मूळ हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे आहे, असा शिंदे गटाचा दावा आहे. शिंदे यांच्या गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आमच्याकडे बाळासाहेबांच्या विचारावर निष्ठा असलेले सैनिक आहेत असे नमूद केले.

शिंदे सेनेने ठाणे, कल्याण परिसरातील त्यांची ताकद राखली. कोकणात भाजपचा विजय झाला. मात्र मुंबईचा गड उद्धव ठाकरे गटाने राखला, असे त्या गटाचे मानणे आहे. मुंबईत लोकसभेची एक जागा शिंदे गटाने निसटत्या मतांनी जिंकली. तिथे गैरप्रकाराचे आरोप गाजत आहेत. ‘मुंबई खऱ्या शिवसेनेचीच’ असे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे म्हणणे आहे. मात्र शिंदे गटाने ठाकरे गटाने जिंकलेल्या जागा या अल्पसंख्यांकांच्या मतांमुळे आहेत, असा प्रचार सुरू केला आहे.

अल्पसंख्याकांची मते ठाकरे गटाला

दक्षिण मुंबईत मुंबादेवी, भायखळा येथील अल्पसंख्याक समुदायांनी अरविंद सावंत यांच्या पारड्यात निर्णायक मते टाकली तर दक्षिण मध्य मुंबईत अणुशक्तीनगर, चेंबूर या भागातल्या अल्पसंख्याक मतदारांनी आणि धारावीतल्या कॉँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी अनिल देसाईंना जिंकवले. माहिम, वडाळा हा मराठीबहुल भाग राहुल शेवाळेंसमवेत राहिल्याचा दावा सुरु ठेवला.

शिंदे यांच्या नेतृत्वाला पसंती देत मुंबईतल्या नगरसेवकांनी ठाकरे गट सोडला असला तरी विधानसभा आणि महापालिका निवडणुका आम्ही जिंकू याचा विश्वास निकालांआधी आणि निकालांनंतर व्यक्त केला आहे. शिवसेना हा मुंबईचा आवाज आहे. पक्षातून बाहेर पडलेल्यांचा नाही तर उद्धव ठाकरे यांचा आहे, असा विश्वास अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.