गेल्या दोन दिवसांत सातत्याने भेटी सुरू असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्याच्या राजकारणात गेले काही दिवस विविध चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे नेतेमंडळी सत्तेत असूनही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत दिसले. शिवसेनेच्या आमदाराने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांनी भाजपशी पुन्हा युती करण्याबाबत विनंती केली. राष्ट्रवादीच्या आव्हाडांनी घेतलेला टाटा हॉस्पिटलसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांनी रद्द केला. या साऱ्या घडामोडी पाहता महाविकास आघाडीत सारंकाही आलबेल आहे की नाही अशी चर्चा रंगली आहे. तशातच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. त्यानंतर तेथूनच ते थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले आणि तेथे त्यांनी पवारांशी सुमारे २० मिनिटं चर्चा केली. या साऱ्या घडामोडींनंतर महाविकास आघाडी टिकून राहावी यासाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा धावाधाव सुरू आहे की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. (Shivsena Sanjay Raut Meeting NCP Chief Sharad Pawar after CM Uddhav Thackeray)
दरम्यान, पवार यांच्याशी भेटीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी भक्कम असल्याचा पुनरूच्चार केला. ते म्हणाले, "मी काही खास कारणास्तव मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. तर शरद पवार यांची मी सदिच्छा भेट घेतली. महाविकास आघाडीत अजिबात संभ्रमावस्था नाही. अत्यंत सुरळीत, सरळसोट आणि योग्य मार्गाने ही आघाडी पुढे निघालेली आहे. सरकार पाच वर्षाचा कार्यक्रम पूर्ण करेल. बाहेर उगाचच भ्रम पसरवले जातात. ते कोण पसरवत आहे हे चांगलंच माहिती आहे. पण अशा प्रकारच्या अफवा आणि भ्रम निर्माण करून या सरकारचं काहीही वाईट होणार नाही."
"सरकार अस्थिर होईल या भ्रमात कोणी राहू नये. मिडियाच्या माध्यमातून भ्रम निर्माण केले जात आहेत म्हणून वारंवार सांगावे लागते. कारण तुम्हाला आता कृतीतूनच दिसेल की सरकार किती गंभीर आहे. बैठक ही चौकशीसाठी वगैरे नसते. महाविकास आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक हे शरद पवार आहेत. त्यांनीही सांगितलंच आहे की उद्धव ठाकरे योग्य काम करत आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. आमच्यात संशयास्पद वातावरण नाही. दिल्लीच्या बैठकांचा येथे कोणताही परिणाम होत नाही", असेही संजय राऊत म्हणाले.
"महाविकास आघाडी सरकार स्वबळावर आलं आहे आणि राजकीय पक्ष स्वबळावर आले आहेत. आमच्याही बैठका होतात. पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटलो यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. त्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं. मुख्यमंत्री नव्हते तेव्हा तर मी रोजच त्यांना भेटत होतो. आमची रोज फोनवरून चर्चा सुरू असते. सूत्र जागी झाली असतील तर त्यांना जागं राहू द्या. त्यांना झोपेची गोळी कधी द्यायची ते आम्ही पाहू", असे त्यांनी सांगितले.
"प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रकरणात त्रास दिला जात आहे. या संदर्भात बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब, मी उपस्थित होतो. जर आमचा आमदार अडचणीत आला असेल आणि त्याला विनाकारण त्रास देत असतील तर काय मार्ग काढावा हे पाहावे लागेल. पक्ष पूर्णपणे प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी आहे आणि राहिल. माझा सर्व आमदाराशी संवाद ठेवू नये. प्रताप सरनाईक आणि माझी चर्चा झालेली आहे. ते सारे शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेतच राहणार. ज्या कोणी प्लॅन ए आणि प्लॅन बी केला असेल, त्या सगळ्यांना मी सांगतो की आमच्याकडे 'प्लॅन प्लस' आहे", असं राऊतांनी सूचक वक्तव्य केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.