महाविकासआघाडीतल्या मंत्र्यालाच शिवसेनेकडून 'हा' खोचक सल्ला

महाविकासआघाडीतल्या मंत्र्यालाच शिवसेनेकडून 'हा' खोचक सल्ला
Updated on

मुंबई- महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं चांगलंच थैमान घातलं आहे. देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पाहिल्यास सर्वाधिक आकडा हा महाराष्ट्रात आहे. राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार विविध पातळीवर प्रयत्न करताहेत. यासाठी पोलिस दल अहोरात्र रस्त्यावर दिसाहेत. त्यातच आता पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारांवर गेला आहे. त्यात 1 हजार 25 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच गेल्या  24 तासात 225 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात पोलिसांची काळजी करणारा अग्रलेख मांडला आहे. तसंच अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या गृहविभागाला खोचक असा सल्लाही दिला आहे. 

पोलिसांना वाली कोण? या शिर्षकाखाली सामनात आज हा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

गेल्या 24 तासांतच 225 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यात 106 अधिकारी आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापुरात कोरोनाग्रस्त पोलिसांचे मृत्यू झाले आहेत. अनेक ठिकाणी कोरोनाने मरण पावलेल्यांना खांदा द्यायला त्यांच्याच आप्त, मित्र परिवाराने नकार दिला, तेव्हा पोलिसांनी त्या कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार केले. अशा पोलिसांचे मनोबल वाढवायला हवे. पोलिसांना वाली कोण, असा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असा खोचक सल्ला शिवसेनेनं गृहविभागाला दिला आहे. 

पोलिस दलाचे मनोधैर्य खचणं महाराष्ट्राच्या परंपरेस परवडणारं नाही

पुढे अग्रलेखात म्हटलं आहे की, कोणी काही म्हणोत, पण निदान महाराष्ट्रात तरी खरे कोरोना योद्धे हे पोलीस, डॉक्टर्स व परिचारिका आहेत. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे व योद्ध्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. पोलिसांना उसंत नाही, विश्रांती नाही, ते अहोरात्र झुंज देत आहेत. कोरोनासारखा एक विषाणू पोलीस खातेही हतबल करताना दिसत आहे. पोलिसांसारख्या मजबूत संस्थांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होणे, त्यातून या दलाचे मनोधैर्य खचणे महाराष्ट्राच्या परंपरेस परवडणारे नाही. 

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात 

मुंबईच्या पोलिसांनी भल्याभल्या गुंडापुंडांना सरळ केले आहे. अनेक चोर-लुटारूंच्या मुसक्या आवळल्या आहेत. हिंस्र दंगलखोरांना आपले पोलीस बेडरपणे सामोरे गेले आहेत. प्रसंगी जीवाची बाजी लावली आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य नेहमीच चोख बजावले आहे. एकट्या मुंबई शहरातच चारशे पोलिस कोरोनाने त्रस्त आणि ग्रस्त आहेत.

पोलिस आणि सैनिक हा 'Disciplinary force' आहे. म्हणजे आदेश आणि शिस्त पाळणारा फोर्स आहे. जनतेच्या, राष्ट्राच्या संरक्षणासाठी ते सदैव सज्ज आहेत. आज कोरोना संकटातही सिक्कीमच्या सीमेवर आमचे सैनिक घुसखोरी करणाऱ्य़ा चिनी सैनिकांना भिडत आहेत. त्यांना इंच इंच मागे रेटत आहेत. कश्मीर खोऱ्य़ात सैनिक दहशतवाद्यांशी लढत आहेत. अर्थात, हा शत्रू समोर दिसणारा आहे आणि त्याच्या मस्तकावर, छाताडावर गोळी मारण्याची हिम्मत आमच्या सैनिकांत आहे, पण पोलिसांना कोरोना नावाच्या अदृश्य शक्तीशी लढावे लागत आहे.

सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एएसबी दलांचे जवान कोरोनाग्रस्त झाले आहेत. ज्यांच्या भरवशावर आपण सगळे आहोत ते पोलिस दल कोरोना विषाणूच्या हल्ल्याने बेचैन झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिसांविषयी सहानुभूती, संवेदना वगैरे व्यक्त केली.

राज्यातील पोलिसांना थोडी विश्रांती देऊन केंद्राकडून अधिकचे मनुष्यबळ महाराष्ट्रात मागवावे असे त्यांचे मत आहे आणि ते चुकीचे नाही, पण जे केंद्रीय सुरक्षा बल राज्याला हवे आहे त्यातही कोरोनाने घुसून सगळ्यांना हवालदिल करून सोडले आहे.

महाराष्ट्राच्या तुरुंगांवर कोरोनाने भयंकर हल्ला केला आहे आणि ज्या ऑर्थर रोड तुरुंगाच्या भिंती कसाबसारख्या दहशतवाद्याची मिजास उतरवत होत्या, त्या मजबूत भिंतीच्या पलीकडेही कोरोनाचे थैमान सुरू आहे. शंभरावर कैदी आणि तुरुंग कर्मचारी कोरोनाग्रस्त झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

पोलिस खात्याचे महासंचालक सुबोध जयस्वाल यांना हे आव्हान आहे. पोलिसांचे मनोधैर्य वाढवायलाच हवे, पण पोलिसांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे एखाद्या हिम्मतबाज मर्दासारखे सामान्य पोलिस शिपायांसोबत मैदानात आहेत.

मजूरवर्ग जो हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आपापल्या राज्यात पायी निघाला आहे त्यांना रोखण्याचे, प्रसंगी बळाचा वापर करून थांबविण्याचे कामही पोलिसांना करावे लागत आहे. त्या गर्दीतून सुटलेले विषाणूबाणही पोलिसांचे घात करत आहेत आणि हे सर्व संकट पोलिस महाराष्ट्रासाठी छाताडावर झेलत आहेत.

अभिनेता जितेंद्र जोशी याने कोरोना रणातील झुंजार पोलिसांना मानवंदना देणारे एक गाणे रचले व लोकांसमोर आणले ते उत्तमच आहे. कोरोनाच्या लढाईत जनतेला वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्य़ा पोलिसांना वाचवायला हवे!

shivsena taunts leader of mahavikas aaghadi read news related to politics during lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.