धक्कादायक... पाण्याअभावी खोळंबल्या शस्त्रक्रिया
कळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रोज ठाणे व पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील व ठाणे शहरातील मुंब्रा परिसरातील हजारो गरीब रूग्ण दररोज उपचारासाठी दाखल होतात. मात्र, रुग्णालयाच्या नियोजनाअभावी पाणी कमी पडत असल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या किंबहुना तातडीच्या रुग्णांना मुंबईतील रुग्णालयांत शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्याची नामुष्की ओढावत असल्याची बाब उघड झाली आहे.
कळवा रुग्णालयात रुग्णांनी ओपीडीमध्ये (बाह्यरुग्ण कक्ष) एक्सरे, रक्त तपासणी, सोनोग्राफी करण्यासाठी महिनाभर अनेक फेऱ्या मारलेल्या असतात. त्यानंतर डॉक्टरांच्या शिफारसीनुसार त्यांना शस्त्रक्रियेसाठी वॉर्डमध्ये दोन-तीन दिवस आधी दाखल करण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात असल्याचे समोर आले आहे.
यात अनेक रुग्णांची फरफट होते. काही रुग्णांना चक्क मुंबईतील सायन, के. ई. एम., जे. जे. रुग्णालयात पाठवले जाते. शस्त्रक्रियेच्या सर्व सुविधा असताना रुग्णालयात नेमकी ही समस्या का निर्माण झाली? याचा शोध घेतला असता रुग्णालयात पाणी कमी पडत असल्याने या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात असल्याचे शस्त्रक्रिया विभागातील अधिकाऱ्याने खासगीत सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर ठाणे पालिका दरवर्षी अर्थसंकल्पातून कोट्यवधी रुपयांची तरतूद करीत असते. परंतु रुग्णालयात पाणी कमी पडत असल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रुग्णालयात ठाणेसह पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा परिसरातील अनेक गरीब रुग्ण अल्पदारात शस्त्रक्रिया होतात म्हणून येत असतात.
मात्र पाण्याअभावी शस्त्रक्रिया रद्द होत असल्याने त्यांची मोठी फरपट सुरू आहे. रुग्णालयात काही वर्षांपूर्वी रुग्णालयातील पाणीपुरवठा विभागाचे काम बांधकाम विभाग पाहत होते. मात्र, प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने सध्या पाणीपुरवठा विभागाचा भार विद्युत विभागाकडे सोपवण्यात आल्याचे कळते. जेव्हा रुग्णालयात पाण्याची समस्या निर्माण होते तेव्हा संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे कर्मचारी सांगतात.
पाण्याचा स्त्रोत असताना वापर नाही!
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा खाडी किनारी असल्याने पाण्यासाठी रुग्णालयाच्या मागे कूपनलिका (बोअरवेल) मारल्यास अगदी तीन ते चार फुटावर मुबलक पाणी मिळू शकते. त्याचा खर्चही अवघा 40 ते 50 हजार रुपये होऊ शकतो. या पाण्याचा वापर स्वच्छतागृह, शस्त्रक्रिया सफाई, रुग्णालयात परिसर स्वच्छतेसाठी होऊ शकतो. परंतु असे असताना रुग्णालयाच्या मनमानी कारभारमुळे पाण्याचा मुबलक स्त्रोत असतानाही त्याचा वापर होत नसल्याची खंत कर्मचारी व्यक्त करतात.
रुग्णालयाच्या परिसरात जलवहिनी फुटल्यामुळे रुग्णालयात पाण्याची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या लवकरच दूर होईल. तसेच या पुढे पाण्याच्या पर्यायी व्यवस्थेसंदर्भात विचार करण्यात येईल.
डॉ. एन. शैलेश्वर, अधीष्टाता
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा
मी सहा दिवसांपूर्वी हातावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. मात्र अद्याप शस्त्रक्रिया झालेली नाही.
- रवींद्र पाटील, रुग्ण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.