मनोर : मनगटाचे हाड मोडल्याने उपचारासाठी येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी (ता.1) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. तरुणाच्या वडिलांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. संतप्त ग्रामस्थ आणि तरुणाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलसमोर गर्दी करीत कारवाईची मागणी केली होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मिलिंद सुभाष निकोले (23, रा. फरलेपाडा, लालोंढे) असे मृत तरुणाचे नाव आहे. कबड्डी खेळताना पडल्याने मिलिंदचे मनगटाचे हाड मोडले होते. मनगटाच्या हाडाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानुसार मिलिंद शनिवारी सकाळी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर सायंकाळी चार वाजता त्याच्या मनगटावर अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ पोदे यांनी भूलज्ज्ज्ञ डॉ. प्रसाद तरसे यांच्या साथीने शस्त्रक्रिया केली होती.
सायंकाळी सहा वाजता शस्त्रक्रिया पूर्ण झाली. शस्त्रक्रियेदरम्यान भूल देण्याच्या इंजेक्शनमुळे बेशुद्ध झालेला मिलिंद शस्त्रक्रिया संपल्यानंतरही शुद्धीवर आला नव्हता. त्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी केल्यानंतर हॉस्पिटलच्या परिचारिकांनी डॉक्टरांना पाचारण केले होते. या वेळी उपचारादरम्यान मिलिंदचा मृत्यू झाला.
डॉक्टरांवर कारवाईची मागणी
सह्याद्री हॉस्पिटलचा हलगर्जीपणा आणि चुकीच्या उपचारामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे मिलिंदचे वडील सुभाष निकोले यांनी सांगितले. तसेच हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनोर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रताप दराडे यांनी या वेळी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.