डोंबिवली, ता. 22 - कल्याण लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेला आपले वर्चस्व अबाधित ठेवायचे असल्यास त्यांना पुन्हा पूर्ण ताकदीनिशी रणधुमाळीत उतरावे लागणार आहे. देशात पंतप्रधान मोदी यांच्या हॅट्रिकसाठी भाजप प्रयत्न करत आहे.
मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील कार्यकर्त्यांचे फारसे पटत नसल्याचे उघड आहे. यामुळे सेनेने भाजपचे मंत्री चव्हाण यांना हाताशी धरून उमेदवार जाहीर होण्याआधीच प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. यात कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र हे केंद्रबिंदू ठरणार आहे. शिवसेनेला येथे उघड उघड विरोध होताना दिसत असून त्या मतदारसंघात सध्या शिवसेना पदाधिकारी जाणे टाळत आहेत.
लोकसभेचा विचार करता कल्याण पूर्व हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा आहे. भाजपची नाराजी व ठाकरे गटाचे वर्चस्व यामुळे येथील मतदार हा किंगमेकर ठरणार आहे. त्यामुळे येथील नाराजी सेनेला महागात पडू शकते.
लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या असून उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात प्रचार देखील सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी तसेच त्यांच्या हॅट्रिकसाठी भाजपचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे पुन्हा खेचण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असताना खेचून आणलेला लोकसभा मतदारसंघ हातून जाऊ नये यासाठी शिवसेना लढाई देत आहे. या मतदारसंघातून अद्याप महायुतीने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा सेनेसाठी कळीचा मुद्दा ठरला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यामुळे शिवसेना शिंदे गट आता ठाणे जिल्ह्यातील आपली ताकद सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. त्यातच काही मतदारसंघात भाजप व सेनेच्या कार्यकर्त्यांचे पटत नाही. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सेनेला झालेला विरोध तसेच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे कल्याण पूर्वेत युतीमधून विस्तव जात नसल्याचे दिसते.
2019 च्या निवडणुकीत भाजपच्या साथीने जास्त मताधिक्याने सहज विजय मिळालेल्या शिवसेनेला 2024 चा विजय पाहण्यासाठी मित्रपक्षांची मनधरणी करावी लागणार आहे. त्यासाठी भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना हाताशी धरून शिवसेनेने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथे महायुतीचे मेळावे घेण्यात आले. मात्र कल्याण पूर्वेत मेळावा घेणे महायुतीने टाळले आहे.
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड यांना डावलून मेळावा घेणे शक्य नाही. गणपत गायकवाड हे दोन वेळा अपक्ष आणि मागील निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक जिंकले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतरही भाजपने अप्रत्यक्षपणे गणपत गायकवाड यांची पाठराखण केली आहे. आमदार गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. मात्र, त्यांची पत्नी सुलभा गायकवाड या भाजपच्या वतीने मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. गणपत गायकवाड तुरुंगात गेल्यामुळे शिवसेनेला तेथे मैदान मोकळे मिळू नये यासाठी भाजपने त्यांच्या पत्नीला राजकारणात सक्रिय केले आहे.
आमदार गायकवाड यांच्या समर्थकांचा विरोध व शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पहिल्यापासून या मतदारसंघात पारडे जड राहिले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत व सुषमा अंधारे यांचा दौरा या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे येथील मतदारांची भुमिका की निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहे. परिणामी यंदाच्या लोकसभा निवडणूकित कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ केंद्रबिंदू ठरणार आहे.
भौगोलिक व मतदारांचा विचार करता हा संघ महत्वाचा आहे. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील मलंगगड पट्यातील गावे, लागून असलेले कल्याण ग्रामीण, उल्हासनगर, अंबरनाथ तालुका अशा शहरांच्या सीमांकीत भाग या विधानसभा मतदारसंघात येतो. येथे उत्तर भारतीय तसेच भूमिपुत्र म्हणजेच आगरी कोळी समाजाच्या मतांचा जास्त पगडा आहे.
भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी अवघड जागेचे दुखणे ठरणार आहे.दिवा व कल्याण पूर्वेतील भाजपचे कार्यकर्ते हे आजही शिवसेनेवर नाराज आहेत. ते उघडउघडपणे
आमदार गायकवाड यांना समर्थन देत आहेत. त्यामुळे गायकवाड आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूकित महत्व दिले नाही तर ही लोकसभा महायुतीला जास्त मताधिक्याने जिंकणे कठीण होईल असे जाणकारांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.